अनिल कांबळे
नागपूर,
nagpur mining fraud case मायनिंग व्यवसायात भागीदारी केल्यानंतर कंत्राट मिळविले व त्यानंतर भागिदारालाच बनावट सहीने राजिनामा सादर करुन कंपनीतून बाहेर काढून ८० लाखांची फसवणूक करण्यात आली. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे बाहेर करण्यात आल्याची तक्रार संबंधित महिला भागिदाराने केली आहे.
प्रांजली नामदेव गादेवार (सहकारनगर) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्यांचे वडील दिलीप डेकाटे यांच्या वडिलांना मायनिंग क्षेत्रातील तब्बल ३५ वर्षांचा अनुभव आहे. आरोपी रत्नदीप दीपक सोमकुंवर (खापा, सावनेर) आणि पंकज वंजारी (खापा, सावनेर) यांनी त्यांच्याशी जवळीक साधली. नवीन मायनिंग कंपनी सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी डेकाटे यांना दिला. डेकाटे यांनी प्रस्तावाला नकार दिला. मात्र, आरोपी सातत्याने त्यांची भेट घेतच होते. अखेर आरोपी व प्रांजली यांच्या पार्टनरशिपमध्ये कंपनी स्थापन करण्याचे ठरले. कंपनी सुरू झाल्यानंतर ओडिशातील मायनिंग प्रकल्पांसह अनेक कामे मिळाली. कंपनीच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू झाली. २०२४ मध्येच विविध व्यवहारांमधून दीड कोटी रुपयांहून अधिक रक्कम कंपनीच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले. मात्र, याच काळात आर्थिक व्यवहारांमध्ये मोठा घोळ सुरू असल्याचा संशय निर्माण झाला. प्रांजली यांनी बँक खात्यांची तपासणी केली असता कंपनीतील मोठी रक्कम रत्नदीप सोमकुंवरच्या वैयक्तिक खात्यात वळविण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केल्यावर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली व तुम्हाला मला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर सीएच्या मदतीने कागदपत्रांची पडताळणी केली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली.
अशी केली फसवणूक
प्रांजली यांच्या nagpur mining fraud case नकळत कंपनीतील भागीदारी कमी करण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून राजीनामा तयार करण्यात आला आणि कंपनीच्या संचालकपदावरून त्यांना हटविण्यात आले. कंपनीच्या नोंदींमध्ये फेरफार करून नवीन संचालकांची नावे समाविष्ट करण्यात आली. तसेच दुसऱ्या एका कंपनीतही त्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे संचालक दाखविण्यात आल्याचा दावा करण्यात प्रांजली यांनी केला. या संपूर्ण प्रकारात कंपनीच्या खात्यातील कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला असून, प्रांजली यांनी ८० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली. पोलिसांनी रत्नदीप सोमकुंवर आणि पंकज वंजारी यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात आणि कट रचण्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. कंपनीतील नियंत्रण हाती घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला का, याचा आता पोलिस तपास करीत आहेत.