नागपूर ग्रामीणमध्ये गुन्हेगारीत लक्षणीय घट

हत्याकांडामध्ये ५४.५५ टक्के टक्क्यांनी घट

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
rural crime नागपूर ग्रामीण जिल्ह्यात २०२६ च्या पहिल्या पाच महिन्यांत गुन्हेगारीत लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. खून, चोरी, अपहरण, विनयभंग, मारहाण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये २०२५ च्या तुलनेत मोठी घट झाल्याचे नागपूर ग्रामीण पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
 

nagpur rural crime decline 
जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमा, सराईत गुन्हेगारांविरोधातील कठोर कारवाया आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुन्हे प्रतिबंधक उपक्रम राबविण्यात आले. जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत नागपूर ग्रामीणमध्ये २२ खुनांचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. यावर्षी त्याच कालावधीत केवळ १० खुनांचे गुन्हे दाखल झाले असून, त्यात ५४.५५ टक्क्यांची घट झाली आहे. खुनाचा प्रयत्न या प्रकारातील गुन्हे २०२५ मधील २३ वरून २०२६ मध्ये २१ वर आले असून, ८.७ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.मारहाण आणि दुखापतीसंदर्भातील गुन्ह्यांमध्येही घट झाली आहे. २०२५ मध्ये ४५८ गुन्हे नोंदविले गेले होते, तर २०२६ मध्ये ही संख्या ३४२ वर आली असून २५.३३ टक्क्यांची घट झाली आहे.

विनयभंगाच्या गुन्ह्यांत २० टक्के घट
२०२५ मध्ये पहिल्या पाच महिन्यांत महिलांविरुद्धच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येही घट झाली आहे. २०२५ मध्ये ९५ गुन्हे नोंदविले गेले होते, तर २०२६ मध्ये ७६ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये २० टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत ८६ अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते. यंदा ही संख्या ७९ वर आली असून ८.१४ टक्क्यांनी घट झाली आहे. चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक सुधारणा दिसून आली. २०२५ मध्ये ६१३ चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. यंदा ही संख्या ४३७ वर आली असून २९ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
 
 
मोक्का आणि कोम्बिंग ऑपरेशनचा परिणाम
पोलिसांच्या मते, संघटित गुन्हेगारीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का), एमपीडीए अंतर्गत कारवाया, तडीपार प्रक्रिया, सराईत गुन्हेगारांवरील लक्ष, नियमित कोम्बिंग ऑपरेशन, आरोपी ओळख परेड तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. ग्रामीण भागातील कुख्यात आणि पुनरावृत्ती करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी विशेष नजर ठेवली असून, गंभीर गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. जानेवारी ते मे २०२६ या कालावधीतील आकडेवारीवरून नागपूर ग्रामीण पोलिसांच्या सक्रिय आणि परिणामकारक पोलिसिंगमुळे जिल्ह्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. सराईत आणि संघटित गुन्हेगारांविरोधातील लक्षवेधी कारवायांमुळे गुन्हेगारीला आळा बसत असल्याचे या आकडेवारीतून अधोरेखित झाले आहे.
नागपूर ग्रामीण पोलिसांनी भविष्यातही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीत आणखी घट घडवून आणण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक आणि अंमलबजावणीच्या उपाययोजना सुरू ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिसांच्या सकारात्मक कारगिरीचा परिणाम दिसून येत आहे.
- अनिल म्हस्के (अप्पर पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण पोलिस)