अचूक आयकर विवरणपत्राचा मजबूत पाया

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
अर्थविशेष…
हितेश पारसे
Income Tax Return काही वर्षांपूर्वीपर्यंत आयकर विवरणपत्र दाखल करताना करदाते प्रामुख्याने फॉर्म १६, बँकेचे व्याज प्रमाणपत्र किंवा आपल्या लेखापालाने तयार केलेल्या उत्पन्नाच्या तपशीलावर अवलंबून असत. करदात्याने दिलेल्या माहितीवरच कर विभागाची पडताळणी होत असे आणि त्यामुळे अनेक व्यवहार नोंदवले गेले नाहीत तरी ते लगेच लक्षात येत नसत. मात्र, गेल्या काही वर्षांत भारतातील करप्रशासनामध्ये मोठा बदल झाला आहे. आयकर विभागाने डिजिटल तंत्रज्ञान, डेटा अॅनालिटिक्स, आणि माहितीची स्वयंचलित देवाणघेवाण यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे. आज बँका, पोस्ट ऑफिस, सहकारी संस्था, म्युच्युअल फंड कंपन्या, स्टॉक एक्स्चेंज, शेअर ब्रोकर्स, विमा कंपन्या, नोंदणी कार्यालये, मालमत्ता निबंधक, नियोक्ते आणि विविध सरकारी संस्था करदात्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती नियमितपणे आयकर विभागाला सादर करतात. यामुळे आयकर विभागाला तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती तुम्ही आयटीआर दाखल करण्यापूर्वीच उपलब्ध असते. त्यामुळे आयटीआर दाखल करणे म्हणजे केवळ उत्पन्नाची माहिती देण्याची प्रक्रिया राहिलेली नसून, आयकर विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीची पडताळणी करून ती योग्य पद्धतीने जुळविण्याची प्रक्रिया झाली आहे.
 
 

Tax Return
 
याच पार्श्वभूमीवर एआयएस, टीआयएस आणि फॉर्म २६एएस या तिन्ही दस्तऐवजांचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. एआयएस, टीआयएस आणि फॉर्म २६एएस कडे दुर्लक्ष करणे किती धोकादायक ठरू शकते? अनेक करदाते अजूनही असा समज करून आयटीआर दाखल करतात की, “माझ्याकडे जेवढी माहिती आहे तेवढेच उत्पन्न दाखवायचे. परंतु आज ही पद्धत धोकादायक ठरू शकते. जर करदात्याने एआयएस, टीआयएस आणि फॉर्म २६एएस तपासले नाही, तर त्याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.
१. उत्पन्नाचा एखादा स्रोत नकळत राहू शकतो : आजच्या काळात एका व्यक्तीकडे अनेक प्रकारचे उत्पन्न असू शकते. उदाहरणार्थ –बचत खात्यावरील व्याज,मुदत ठेव वरील व्याज,सहकारी बँकेतील ठेव, पोस्ट ऑफिस ठेव, लाभांश), म्युच्युअल फंडाचे वितरण, शेअर्स विक्रीवरील भांडवली नफा, बाँड्सवरील व्याज, व्यावसायिक मानधन, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील उत्पन्न, भाडे उत्पन्न. अनेक वेळा करदाता केवळ मुख्य उत्पन्न लक्षात ठेवतो आणि इतर लहान-मोठे उत्पन्न विसरतो. मात्र ही सर्व माहिती एआयएस मध्ये उपलब्ध असू शकते. आयटीआर मध्ये ही माहिती न दाखविल्यास आयकर विभागाच्या प्रणालीला ती विसंगती सहज लक्षात येते.
२. टीडीएस जमा : गमावण्याची शक्यता : अनेक संस्था तुमच्या उत्पन्नावर टीडीएस कपात करतात. पण जर ती माहिती फॉर्म २६एएस मध्ये योग्य प्रकारे तपासली नाही, तर तुम्हाला मिळणाऱ्या कर श्रेयाचा लाभ कमी होऊ शकतो. यामुळे दोन प्रकारचे नुकसान होऊ शकते. पहिले म्हणजे, प्रत्यक्षात भरलेल्या करापेक्षा अधिक कर भरावा लागू शकतो. दुसरे म्हणजे, तुम्हाला मिळणारा आयकर परतावा कमी मिळू शकतो किंवा उशिरा मिळू शकतो. थोडक्यात, स्वतःचेच पैसे परत मिळण्यासाठी अतिरिक्त प्रक्रिया करावी लागू शकते.
३ चुकीच्या माहितीमुळे अनावश्यक कर भरण्याची वेळ येऊ शकते : अनेक वेळा बँका किंवा इतर संस्थांकडून चुकीची माहिती आयकर विभागाकडे अपलोड होते. उदाहरणार्थ – एखादा व्यवहार दोनदा रिपोर्ट होणे, चुकीच्या पॅन वर व्यवहार दाखविला जाणे, व्यवहाराची रक्कम चुकीची नोंदविणे,संबंधित नसलेले उत्पन्न दिसणे. जर एआयएस तपासले नाही आणि त्यावर अभिप्राय दिला नाही, तर पुढे त्याच चुकीच्या माहितीच्या आधारे कर आकारणी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
४. उच्च मूल्याच्या व्यवहारांवर आयकर विभागाचे लक्ष जाऊ शकते : आयकर विभागाला वित्तीय व्यवहारांचे विवरण (एसएफटी) अंतर्गत अनेक प्रकारच्या व्यवहारांची माहिती नियमितपणे मिळते. उदाहरणार्थ – मोठ्या रकमेची बँकेत रोकड जमा, मुदत ठेवी, उच्च मूल्याचे क्रेडिट कार्ड व्यवहार, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडातील मोठी गुंतवणूक, मालमत्ता खरेदी किंवा विक्री, परदेशी प्रवासावरील खर्च, रोख स्वरूपातील मोठे व्यवहार. जर अशा व्यवहारांची माहिती एआयएस मध्ये उपलब्ध असूनही त्यास अनुरूप उत्पन्न किंवा निधीचा स्रोत आयटीआर मध्ये स्पष्ट केला गेला नाही, तर आयकर विभाग त्या व्यवहारांबाबत स्पष्टीकरण मागू शकतो.
५. संगणकीय पडताळणी अधिक प्रभावी झाली आहे : पूर्वी कर विवरणपत्रांची तपासणी प्रामुख्याने मानवी अधिकाऱ्यांकडून केली जात असे. आज मात्र आयकर विभाग अत्याधुनिक डेटा अॅनालिटिक्स प्रणालीचा वापर करतो. ही प्रणाली खालील बाबींची तुलना करते – आयटीआर मधील माहिती, एआयएस मधील माहिती, टीआयएस मधील सारांश, फॉर्म २६एएस मधील कर जमा, एसएफटी व्यवहार, टीडीएस/टीसीएस माहिती, विविध संस्थांनी सादर केलेली माहिती. यामध्ये अगदी किरकोळ विसंगतीदेखील प्रणालीच्या निदर्शनास येऊ शकते.
६. नोटीस, चौकशी किंवा स्पष्टीकरणाची शक्यता वाढते : जर आयटीआर मध्ये दाखविलेले उत्पन्न आणि आयकर विभागाकडे उपलब्ध माहितीमध्ये फरक आढळला, तर करदात्याला पुढीलपैकी कोणत्याही प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते – ई-मेलद्वारे सूचना, स्पष्टीकरण मागविणे, सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची गरज,अतिरिक्त कर व व्याज भरण्याची वेळ, काही प्रकरणांमध्ये दंडात्मक कार्यवाही.अर्थात प्रत्येक विसंगतीमुळे नोटीस येतेच असे नाही; परंतु चुकीची किंवा अपूर्ण माहिती भविष्यातील करप्रक्रिया गुंतागुंतीची करू शकते.
७. भांडवली नफ्याची चुकीची गणना होऊ शकते : शेअर्स, म्युच्युअल फंड, जमीन, फ्लॅट किंवा इतर मालमत्तेच्या विक्रीतून झालेला भांडवली नफा हा करदात्यांकडून सर्वाधिक चुकीचा दाखविला जाणारा भाग आहे. एआयएस मध्ये व्यवहारांची माहिती उपलब्ध असते. ती तपासल्यास करदात्याला स्वतःच्या व्यवहारांची खात्री करता येते आणि योग्य गणना करून आयटीआर दाखल करता येतो.
८. पुढील वर्षांवरही परिणाम होऊ शकतो : एका वर्षातील चुकीची माहिती पुढील वर्षांतील – भांडवली तोटा पुढे नेणे , सेट-ऑफ, कर परतावा, भविष्यातील स्क्रूटिनी, आर्थिक विश्वसनीयता, यांवरही परिणाम करू शकते. म्हणूनच प्रत्येक वर्षी अचूक माहिती सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. एआयएस मधील प्रतिक्रिया सुविधा – करदात्याचा महत्त्वाचा अधिकार. एआयएस चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अभिप्राय सुविधा. जर एखादा व्यवहार चुकीचा, अपूर्ण, दुप्पट किंवा तुमच्याशी संबंधित नसल्याचे आढळले, तर करदाता त्यावर ऑनलाइन अभिप्राय देऊ शकतो. ही सुविधा करदात्यांना त्यांच्या आर्थिक माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याची संधी देते. वेळेत दिलेला अभिप्राय भविष्यातील अनावश्यक कर-विवाद टाळण्यास मदत करू शकतो.
सल्ला : आजच्या डेटा-आधारित करप्रणालीमध्ये “जे व्यवहार आयकर विभागाला माहीत आहेत, तेच व्यवहार तुमच्या आयटीआर मध्येही अचूकपणे प्रतिबिंबित झाले पाहिजेत.” हा कर अनुपालनाचा मूलभूत सिद्धांत झाला आहे. म्हणूनच आयटीआर दाखल करण्यापूर्वी एआयएस, टीआयएस आणि फॉर्म २६एएस यांची काळजीपूर्वक पडताळणी करणे ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून, योग्य कर अनुपालन, जलद परतावा, अनावश्यक नोटिसांपासून बचाव आणि आर्थिक पारदर्शकतेची खात्री करण्यासाठी अत्यावश्यक पाऊल आहे. लक्षात ठेवा — आयटीआर दाखल करण्यासाठी काही मिनिटे लागतात; पण एआयएस, टीआयएस आणि फॉर्म २६एएस तपासण्यासाठी खर्च केलेली काही अतिरिक्त मिनिटे भविष्यातील अनेक महिने चालणारा कर-विवाद टाळू शकतात. हा छोटा प्रयत्न तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, कायदेशीरदृष्ट्या सक्षम आणि करदात्याच्या जबाबदारीचे प्रामाणिक पालन करणारा नागरिक बनवतो.