सेलू,
Pandharpur Dindis ओळी प्रमाणे विठ्ठल भेटीची आस मनात बाळगून तालुक्यातील घोराड येथील दोन पायदळ दिंड्या आषाढीवारीसाठी मार्गस्थ होणार आहेत. भेटी लागी जिवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी या अभंगाच्या विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या तीर्थक्षेत्र घोराड येथून दोन पायदळ दिंड्या विठू नामाचा गजर करून पंढरपूरकडे कूच करणार आहे. आषाढी एकादशी जसजशी जवळ येते तसतशी विठू माऊलीच्या दर्शनाची आस लागली असते. यावेळी जुलै महिन्यात आषाढी एकादशी आहे. पण, पायदळ दिंडी ही जून महिन्यात निघणार असून २३ दिवस वारकरी पायदळ चालत पंढरपूर गाठणार आहे.
ज्यावेळी घोराड येथुन दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात, तेव्हा गावातील मुख्य रस्त्याने मंदिर परिकोटला दिंडी प्रदक्षिणा करून विठ्ठल रुख्माई देवस्थानात येतात. तेथे विठू नामाचा गजर होतो आणि सकाळी मंदिरात होणाऱ्या आरतीच्या वेळी वारकरी हजर राहतात. त्यानंतर भवानी मंदिरात मुक्कामी असणारी दिंडी केजाजी महाराज नामाचा जयघोष, विठू नामाचा गजर करून मार्गस्थ होतात. येथून दोन पायदळ दिंड्या निघणार आहेत. २७ रोजी निघणारी पायदळ दिंडी घोराड ते पंढरपूर तर ५ जुलै रोजी निघणारी दिंडी घोराड ते आळंदी वाहनाने प्रवास करून आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडीत सहभागी होणार आहे.
या दोन्ही दिंडीत युवक, वयोवृद्ध पुरुष व महिलांचा समावेश राहणार आहे. दिंडी मार्गस्थ होते वेळी वारकर्यांसोबत काही अंतरापर्यंत गावातील नागरिक सहभागी होणार आहेत. उन्ह, वारा, पाऊस या सर्वांचा सामना करण्याचे सामर्थ्य परमेश्वर देतो असे वारकरी सांगतात. विठू नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताका हरिनामाचा जयघोष करीत निघणाऱ्या विठ्ठल दर्शनाच्या ओढीने आणि भक्तिभावाने भारावलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर निघणार आहे. दोन्ही पायदळ दिंड्यांमुळे गावातील वातावरण भक्तिमय होणार असुन घोराड येथे भक्तीचा उत्सव पाहायला मिळणार आहे.
दोन संतानी सुरू केली पायदळ वारीची परंपरा
घोराड येथे दोन संत होऊन गेले संत केजाजी महाराज हे विठ्ठल भक्त होते ते वर्षातून दोनदा पंढरपूरची पायदळ वारी करीत असे. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज यांनीही ती परंपरा सुरू ठेवली. तीच प्रथा विठ्ठलभक्त हरिभाऊ रामटेके यांनी चालविली. मध्यंतरीच्या काळात पायदळ वारी बंद झाली. त्यानंतर २२ वर्षांअगोदर यवतमाळ जिल्ह्यातील नरेश महाराज गुघाने यांनी हभप बबन माहुरे यांच्या नेतृत्वात पायदळ दिंडीची पुन्हा सुरुवात केली. त्यानंतर हरिदास महाराज महाकाळकर यांनी पायदळ दिंडी सुरू केली. आता येथून दोन पायदळ दिंड्या पंढरपूरला जाणार आहे. त्यापैकी हरिदास महाराज महाकाळकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडी २७ रोजी सकाळी ८ वाजता घोराड येथून पवनार मार्गे जाणार आहे.