वाशीम,
police handcuff शहरात गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणार्या अट्टल घरफोड्या खेत्राजी माणिक पवार (वय ५२ ) रा. खरबी, जि. हिंगोली याला वाशीम शहर गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून रोख रकमेसह एकूण १ लाख १८ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्याने शहरातील सात मोठ्या दुकानफोड्याची कबुली दिली आहे.

आरोपी खेत्राजी हा दिवसा स्वतःची ओळख लपवून, खोट्या नावाने वैद्यकीय उपचार घेण्याच्या बहाण्याने हिंगोलीवरून वाशीम शहरात येत असे. दिवसभर विविध भागात फिरून बंद दुकानाची रेकी करायची आणि रात्रीच्या सुमारास अंगावर घोंगडी (कंबल) ओढून, संपूर्ण चेहरा लपवून दुकाने फोडायची, अशी त्याची गुन्हा करण्याची पद्धत होती. त्याने पाटणी चौक, अकोला रोड, रिसोड नाका, हिंगोली रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लाखाळा परिसरातील राठी बाजार, रेणुकाई पेंट्स, इंगोले अॅग्रो सर्व्हिस सेंटर, बदलाणी डेव्हलपर्स, तिरुपती मार्बल्स, स्वराज ट्रॅटर शोरूम आणि ओम ट्रेडर्स या ठिकाणी चोर्या केल्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३४ (१) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
आरोपीच्या अंगझडतीत आणि बॅगेतून कुलूप तोडण्यासाठी व टीन वाकवण्यासाठी लागणारी लोखंडी टॉमी, मोठा पेचकस, छोटी बॅटरी, टोपी, स्कार्फ आणि गुन्हा करताना अंगावर ओढायची घोंगडी जप्त करण्यात आली. ही कारवाई वाशीमचे पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील), अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संजय चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र आडोळे, पोलिस अंमलदार राजेश राठोड, अष्टसिद्ध नप्ते, नंदकिशोर कुर्हाडे, विशाल इंगळे, किशोर खंडारे आणि विशेष कामगिरी बजावणारे पो.कॉ. अजित खंडाळकर यांनी पार पाडली.