मुंबई
Rohit Pawar राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत समाधान व्यक्त करण्यास आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट नकार दिला असून, सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. पंढरपूर येथे यापूर्वी अन्नत्याग आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेतल्यानंतर सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेत मोठ्या प्रमाणावर अटी घालण्यात आल्याचा आरोप करत सरकारवर विश्वास नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ३० तारखेला एल्गार मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली असून, या भूमिकेमुळे सरकारसमोरील राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू झाल्याचा दावा केला आहे. विधान परिषदेत बुधवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती दिली. सरकारच्या या घोषणेनंतरही विरोधकांकडून या योजनेवर तीव्र आक्षेप घेण्यात येत असून, अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.
काय म्हणाले पवार
नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणावर अटी घालण्यात आल्या असून, त्यामुळे सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचा आरोप त्यांनी केला. पंढरपूरच्या पवित्र भूमीत सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याचा दावा करत त्यांनी, "सरकार खोटे बोलत असेल तर आम्ही काय करणार? त्यामुळे ३० तारखेला एल्गार मोर्चा काढत आहोत," असे सांगितले. हा मोर्चा निघण्यापूर्वीच सरकारला आमच्या मागण्यांची दखल घ्यावी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेदांवरही भाष्य केले. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा गट तयार झाल्याचा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्याने होत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, डिलिमिटेशन कायद्याच्या पार्श्वभूमीवर काही खासदारांचे समर्थन मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून एकनाथ शिंदे यांना मदत झाली असावी, असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील खासदार फोडण्यासाठी शिंदे यांना कोणी मदत केली असेल, असे मात्र आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिलिमिटेशनवरील मतदान होईपर्यंत शिंदे यांचे महत्त्व कायम राहील, असा अंदाज व्यक्त करत २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेनुसार भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल आणि त्या वेळी एकनाथ शिंदे यांचा पक्ष तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही युतीबाहेर असेल, असा मोठा राजकीय दावा त्यांनी केला.
याचवेळी अजित पवार यांच्या Rohit Pawar कुटुंबीयांबाबतही रोहित पवार यांनी भाष्य केले. अजित दादांच्या मृत्यूचा तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी भाजपकडून कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच महायुतीतील मित्रपक्षांकडूनही या प्रकरणाचा पाठपुरावा होत नसल्याचे त्यांनी दुर्दैवी असल्याचे म्हटले. अजित दादांना ज्यांनी त्रास दिला, त्यांनाच पुन्हा संधी मिळत असेल तर त्याचा अर्थ त्यांच्या कुटुंबातील प्रमुख नेत्या सुनेत्रा पवार यांचे पक्षात फारसे ऐकले जात नसल्याचे दिसून येते, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.