- गोंदियासह भंडारा, नागपूर व चंद्रपूरच्या शेतकर्यांचे 439.14 कोटींचे चुकारे मंजूर
प्रमोदकुमार नागनाथे
गोंदिया,
Sale of paddy खरीप पणन हंगाम 2025-26 अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेत यंदाच्या रबी हंगामातील धान विक्री केलेल्या पूर्व विदर्भातील गोंदियासह भंडारा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्यांना लवकरच त्यांच्या घामाचे दाम मिळाणार असून असून 30 मे पर्यंत ज्या शेतकर्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली, अशा शेतकर्यांच्या तब्बल 439.14 कोटी रुपयांचा निधी जिल्हा पणन कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला असून शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या बँक खात्यात चुकार्याची रक्कम जमा होणार असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
खरीप पणन हंगाम 2024-25 मधील अनुभव लक्षात घेऊन यंदा धान खरेदी केंद्रांवर उपलब्ध साठ्यानुसार टप्प्याटप्प्याने शेतकरी चुकारे अदा करण्याच्या सूचना शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला दिल्या आहेत. त्यामुळे धान खरेदी प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहार अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले जाणार आहेत. विशेष म्हणजे, शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेले हजारो धान उत्पादक शेतकरी अनेक दिवसांपासून चुकारे मिळण्याची प्रतीक्षा करीत होते. त्यात खरीप हंमाला सुरुवात झाल्याने काही साधन असलेल्या शेतकर्यांकडून पेरणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र, अद्यापही विक्री केलेल्या धानाची दमडीही मिळाली नसल्याने शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. दरम्यान, राज्य शासनाकडून वित्तीय सल्लागार कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या निधीतून नागपूर विभागातील चार जिल्ह्यांसाठी 439 कोटी 14 लाख 77 हजार 628 रुपये वितरित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यासाठी सर्वाधिक 286 कोटी 92 लाख 21 हजार 575 रुपये देण्यात आले असून 27 हजार 491 शेतकर्यांच्या बँक खात्यात ही रक्कम वळती करण्यात येणार आहे. ज्याची प्रक्रीया संबंधित विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. त्याच बरोबर विभागातील नागपूर जिल्ह्यासाठी 8 कोटी 57 लाख 76 हजार 681 रुपये, चंद्रपूरसाठी 37 कोटी 69 लाख 40 हजार 948 रुपये, भंडारा जिल्ह्यासाठी 105 कोटी 95 लाख 38 हजार 424 रुपयाचे चुकारे मंजूर करण्यात आले आहे.
बळीराजाला दिलासा ...
निधी उपलब्ध झाल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास वेग आला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी तसेच शेतीसंबंधित विविध कामांसाठी हा निधी शेतकर्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.