शिवसेनेची ऑफर, विजय वडेट्टीवार काँग्रेसची साथ सोडणार का?

स्वत:च दिलं स्पष्टीकरण

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
मुंबई
vijay wadettiwar उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. या घडामोडींनंतर शिंदे गटाचे लक्ष आता आमदारांकडे वळले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना अप्रत्यक्षपणे शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 

shiv sena offer, vijay wadettiwar 
उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार हे विदर्भातील प्रभावी आणि ताकदीचे नेते असल्याचे सांगत त्यांच्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. “वडेट्टीवार आमचे चांगले मित्र आहेत. ते एकनाथ शिंदे यांचेही मित्र आहेत. त्यांनी शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर मला सर्वाधिक आनंद होईल,” असे सामंत यांनी म्हटले. तसेच आपण स्वतःही वडेट्टीवार यांच्यासोबत पूर्वी काम केल्याचेही त्यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे वडेट्टीवार यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत चर्चांना आणखी जोर मिळाला.
दरम्यान, या चर्चांवर स्वतः विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट भूमिका मांडत सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. आपण काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असून आपल्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवा या केवळ बदनामीच्या राजकारणाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाशी आपली निष्ठा ठाम असून आपण पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“माझ्या बदनामीचे राजकारण थांबवावे. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला असून महायुती सरकारच्या अपयशावरही मी आवाज उठवला आहे,” असे वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले. तसेच आपल्याबाबत सुरू असलेल्या कथित प्रवेशाच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.“एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का, पक्षप्रवेश करणार का, कोणाला भेटलो का अशा निराधार बातम्या पसरवल्या जात आहेत. यात कोणतेही तथ्य नसताना मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असेही त्यांनी नमूद केले. सत्ता किंवा पदासाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसशी आपली बांधिलकी कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील हालचालींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.