स्मार्ट मीटर हटवा, जुने मीटर बसवा

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
शिवसेना (उबाठा) चा महावितरणवर मोर्चा
 
देवळी : 
Smart meter २६ जून स्मार्ट मीटरची सक्ती बंद करून वीज ग्राहकांना पुन्हा जुने मीटर बसवून द्या, या मागणीसाठी उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख अनंत देशमुख यांच्या नेतृत्वात देवळी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता प्रेमकुमार तेलरांधे यांना निवेदन देण्यात आले. देवळी शहरासह ग्रामीण भागात नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त तर काहींना दुप्पट वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
 

Smart meter 
 
महावितरणचे कर्मचारी नागरिकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवत असून अनेक ठिकाणी दिशाभूल करून किंवा बळजबरीने मीटर बसविले जात असल्याचे निदर्शनात येत आहे. परिणामी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट केले असून ग्राहकांची इच्छा असेल तरच ते बसवावेत, असे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे आधी बसविलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवावेत अशी मागणी करण्यात आली. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.निवेदन देताना विलास निवल, कैलास कुबडे, संजय कपूर, प्रमोद वानखेडे, मारोती दरणे, वैभव खोपाळ, विनोद गुल्हाने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते.