पंढरीची ओढ अन् रेल्वेची जोड!

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
पंढरपूर,
Special train for Pandhari आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होत असतात. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर, नवी अमरावती, खामगाव आणि भुसावळ येथून विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे.नागपूर ते मिरज या मार्गावर गाडी क्रमांक 01205 ही विशेष ट्रेन 23 आणि 24 जुलै रोजी सकाळी 8.50 वाजता नागपूरहून सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता मिरजला पोहोचणार आहे. परतीची गाडी क्रमांक 01206 ही 24 आणि 25 जुलै रोजी दुपारी 12.55 वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला पंढरपूरसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असेल.
 
 
Special train for Pandhari
 
 
नवी अमरावती ते पंढरपूर मार्गावर गाडी क्रमांक 01119 ही 21 आणि 24 जुलै रोजी दुपारी 2.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01120 ही 22 आणि 25 जुलै रोजी रात्री 7.30 वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12.50 वाजता नवी अमरावतीला पोहोचेल. खामगाव ते पंढरपूर मार्गावरील गाडी क्रमांक 01121 ही 21 आणि 23 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01122 ही 22 आणि 24 जुलै रोजी पहाटे 5 वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री 7.30 वाजता खामगावला पोहोचेल.
 
 
भुसावळ ते पंढरपूर मार्गावरील गाडी क्रमांक 01159 ही 24 आणि 25 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01160 ही 25 आणि 26 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता भुसावळला पोहोचेल. या विशेष गाड्यांमुळे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने भाविकांना तिकीट आगाऊ आरक्षित करून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.