नागपूर,
kabir vani कबीर जयंतीनिमित्त चिटणवीस सेंटरतर्फे ‘कबीर के रंग’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५व्या शतकातील संत-कवी कबीर यांचे विचार आणि साहित्य आजही तितकेच प्रेरणादायी आणि आकर्षक आहेत. ‘कबीर के रंग’ या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत, निर्गुणी भजन, उपशास्त्रीय संगीत, ठुमरी, गझल, सुगम संगीत, चित्रपट संगीत, कव्वाली, सुफी कलाम, शेर, लोकसंगीत आणि फ्युजन बँड्स अशा विविध संगीत प्रकारांमधून कबीरांच्या रचनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. विविध संगीतप्रकारांतील कलाकार कबीरांच्या कवितांना आपल्या अनोख्या शैलीत सादर करत रसिकांना एक वेगळा आणि सुरेल अनुभव देणार आहेत.
या कार्यक्रमात नागपूरच्या सुप्रसिद्ध गुरू आणि गायिका डॉ. साधना शिलेदार तसेच प्रतिभावान युवा गायक चेतन बालपांडे यांचे विशेष सादरीकरण होणार आहे. वाद्यसाथीसाठी श्रीकांत पिसे, करण डेकाटे, निखिल मडावी, सुयोग देवलकर आणि गजानन रानडे हे कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच मिताली कोहाड, वरद लोंढे, सुशांत पाटील आणि चेतन सुरतेकर हे गायनसाथ देणार आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन वृषाली देशपांडे करणार असून त्यांच्या प्रभावी निवेदनामुळे कार्यक्रम अधिक रंजक ठरणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, २७ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजता चिटणवीस सेंटर, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रवेश विनामूल्य असून सर्व रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य: योगिता चाकोले, संपर्क मित्र