वाशीम,
notorious motorcycle thieves जिल्ह्यातील कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भडशिवणी येथून झालेल्या दुचाकी चोरीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने आंतरजिल्हा दुचाकी चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी वैभव प्रल्हाद घुले (रा. खापरखेड, जि. बुलडाणा) आणि लखन ऊर्फ पुष्पा देविदास राठोड (रा. मोरगव्हाण, जि. यवतमाळ) या दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले. आरोपींकडून ६ जिल्ह्यांतून चोरलेल्या तब्बल १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत सुमारे ७ लाख रुपये आहे.
भडशिवणी ता. कारंजा येथील राहुल दिलीप राठोड यांची होन्डा शाईन मोटारसायकल (क्र. एमएच ३७ यु ८१४१) घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी पोलिस उपनिरीक्षक निलेश जाधव व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून समांतर तपास सुरू केला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने प्रथम वैभव घुले याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार लखन ऊर्फ पुष्पा याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. दुसरा आरोपी लखन हा यवतमाळ येथे असल्याची माहिती मिळताच पोलिस पथक तेथे पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच लखन याने यवतमाळ बसस्टँड परिसरातील गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र एलसीबीच्या पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून त्याला जेरबंद केले. दोन्ही आरोपींनी मिळून वाशीम, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती ग्रामीण आणि धाराशिव या ६ जिल्ह्यांतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून ७ होन्डा शाईन, एक बुलेट ३५०, एक होन्डा सीडी डिलस आणि एक हिरो पॅशन प्रो अशा एकूण १० मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.notorious motorcycle thieves पुढील तपासासाठी आरोपींना कारंजा ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दीड महिन्यात वाशीम व शेजारील जिल्ह्यातून चोरीला गेलेल्या एकूण ४० मोटारसायकली हस्तगत करून विविध गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. सदर कामगिरी अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि निलेश जाधव, महेश वानखेडे, सुरज खडके, गजानन अवगळे, प्रशांत बक्षी, दिलीप देवकते, गोपाल चौधरी, तुषार ठाकरे, संतोष वाघ आणि सुनील तायडे यांनी बजावली.