नवी दिल्ली,
Vaibhav's batting in practice आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत असलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे. भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झालेल्या वैभवकडून या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय पदार्पणाची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वैभव पहिल्यांदाच भारतीय वरिष्ठ संघाच्या नेट्समध्ये सराव करताना दिसला. या व्हिडिओला बीसीसीआयने “एक विशेष सुरुवात… टीम इंडियाच्या नेट्समधील वैभव सूर्यवंशीची पहिली झलक” असे कॅप्शन दिले आहे.

नेट्समध्ये वैभव सूर्यवंशी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि एकाग्र दिसला. अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांसारख्या अनुभवी गोलंदाजांविरुद्ध त्याने निर्भीडपणे फलंदाजी केली. मोठे फटके खेळताना त्याचा आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवत होता. त्याच्या सरावातील मेहनत आणि तयारी पाहता, मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी तो पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र आहे.वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने भारतीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने ७७६ धावांचा डोंगर उभारला आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. संपूर्ण स्पर्धेत त्याचा स्ट्राइक रेट तब्बल २३७.३० इतका राहिला, जो त्याच्या आक्रमक फलंदाजीची साक्ष देतो.
याशिवाय श्रीलंकेत झालेल्या त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात इंडिया ‘अ’ संघाकडून खेळताना त्याने यजमान संघाविरुद्ध अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. लिस्ट ‘अ’ क्रिकेटमधील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले.आता आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २६ आणि २८ जून रोजी बेलफास्ट येथे आयर्लंडचा सामना करणार आहे. अंतिम संघरचनेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, वैभव सूर्यवंशीला संधी मिळते का याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जर वैभवला पदार्पणाची संधी मिळाली, तर तो केवळ एका युवा खेळाडूच्या कारकिर्दीचा नवा अध्याय ठरणार नाही, तर भारतीय क्रिकेटला भविष्यातील मोठ्या सुपरस्टारची पहिली झलकही मिळू शकते.