अग्रलेख...
vidhimandal adhiveshan विधिमंडळाच्या अधिवेशनकाळातील काही कामकाजातून समाजाला सुखावणारे संकेत मिळू लागल्याने समाधानाचे सुस्कारे टाकून काहीतरी चांगले घडत असल्याचा आनंद व्यक्त करण्याची मानसिक तयारी करावी, तोवर एखादी धक्कादायक बातमी कानावर आदळून सारा हिरमोड व्हावा व सामाजिक भविष्याच्या चिंतेने मन कातर व्हावे असे जे काही अलीकडच्या काळात घडू लागले आहे, ते पाहता अभिमानाने महाराष्ट्राच्या प्रगतीचे गोडवे गावेत, की आसपास घडणाऱ्या घटनांमुळे लाजेने मान खाली घालावी असा प्रश्न पडू लागला आहे. यंदाच्या महाराष्ट्र दिनाचा सोहळा राज्यात सर्वत्र साजरा होत असताना, अशा चिंतेच्या आणि लाजीरवाण्या घटनांच्या मालिकेचा प्रारंभ झाला, ही बाब अधिक दुर्दैवी म्हणावी लागेल. पुणे जिल्ह्यात नसरापूर येथे विकृत पिसाटाने एका अजाण बालिकेचा गोठ्यातील वासरू दाखविण्याचे आमिष दाखवून निर्जन जागी तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा खून करून मृतदेह शेणाच्या खाईत लपविला. या घटनेचे वृत्त राज्यात पसरताच जो संतापाचा उद्रेक झाला, त्यामध्ये महाराष्ट्र दिनी गायिली जाणारी राज्यगीते आणि राज्यावर स्तुतिसुमने उधळणारे पोवाडेदेखील खजिल होऊन फिके पडले.
त्या नराधमाच्या गुन्ह्याची सजा त्याला विनाविलंब मिळते आहे याचा आनंद मानावा, की असे गुन्हे करण्यासाठी धजावणाऱ्या कोणासही कायद्याचा आणि शिक्षेचा धाक राहिला नाही या जाणिवेने खंत करावी हेच समजेनासे झाले आहे. गुरुवारी या प्रकरणातील नराधम आरोपीच्या गुन्ह्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. राज्यातील या लाजीरवाण्या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी त्याच्या विरोधातील खटला सर्वाधिक वेगाने चालविण्यास शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्याप्रमाणे या खटल्यांचे कामकाज वेगवान रीतीने झाले. गुरुवारी या विकृताविरोधातील गुन्ह्याचे माप त्याच्या पदरात पडले आणि असा विकृत गुन्हेगार जगण्याच्या लायकीचा नाही, ही समाजाची भावनादेखील न्यायासनासमोर अधोरेखित झाली. पण या एका गुन्हेगाराच्या शिक्षेचे समाजातील लाजीरवाणी विकृती संपुष्टात आलेली नाही.
जगण्याची लायकी नसल्याचा शिक्का बसू शकेल असे अनेक गुन्हेगार आसपास वावरत असून त्यापैकी काहीजण पांढरपेशा समाजाचा चेहरा घेऊनच वावरत असावेत, असे प्रसंग समाजास हादरे देऊ लागले आहेत. मुंबईच्या उपनगरी रेल्वेगाडीतील प्रवास हा प्रत्येक प्रवाशांसाठी युद्धाचा प्रसंगच असतो. जगण्याच्या स्पर्धेत धावताना जीव मुठीत घेऊन क्षणोक्षणी संकटाचा सामना करण्याची कसोटी ज्या प्रवासात पार पाडावी लागते, अशाच एका प्रवाशात क्षुल्लक कारणावरून दोघा प्रवाशांमध्ये शाब्दिक वादावादी होते आणि एकजण संतापाच्या भरात दुसऱ्या प्रवाशाचे जगातील अस्तित्वच पुसून टाकतो हा प्रकार अंगावर शहारे आणणारा आहेच, पण माणसांच्या मनातील विकृतीची बांडगुळे किती फोफावत चालली आहेत, या चिंतेस अधोरेखित करणारादेखील आहे. पुण्याजवळच्या लोहगडावर पर्यटनास गेलेल्या एका तरुणीने आपल्या नियोजित पतीला धक्का मारून दरीत ढकलून त्याचा जीव घेतल्याच्या बातमीने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला. समाधानाच्या वार्तांची वाट पाहाणाऱ्या समाजमनावर अशा विघ्नवार्तांचा मारा सुरू झालेला असताना, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुखावणाऱ्या पर्जन्यसरींचा आनंद उपभोगण्याची किंवा कर्जमुक्तीच्या सोहळ्यास मुहूर्त मिळाल्याच्या वार्तेने समाधानाचे सुस्कारे सोडण्याची संधी हिरावून घेतली आहे, असा याचा अर्थ नव्हे काय?
पण अशा चिंतेचे सावटदेखील समाजास एवढे सवयीचे होऊ लागले आहे, की अशा घटनांचे हादरे फार काळ समाजमनात टिकून राहू शकत नाहीत. महाराष्ट्रात पतीच्या नियोजित खुनाची घटना घडते, मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये भरदिवसा हत्या होते, राजधानी दिल्लीत एका निष्पाप बालिकेवर बलात्कार होतो आणि संपूर्ण देश हादरून जातो. रस्त्यावर फुगे विकून कुटुंबाच्या चरितार्थाला हातभार लावणारी ११ वर्षांची कोवळी मुलगी फुटपाथवर झोपेत असताना एका विकृत टॅक्सीचालकाने तिला उचलून नेऊन पाशवी बलात्कार केला, आणि तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. नसरापूरच्या नराधमास शिक्षा सुनावली जात असताना, अशाच विकृतीचा आणखी एक धक्का समाजमन अस्वस्थ करून गेला आहे. अशा घटना घडल्या की काही काळ संताप व्यक्त होतो, निषेधाचे सूर उमटतात, कठोर शिक्षेची मागणी होते आणि समाज पुन्हा आपल्या दैनंदिन व्यवहारात गुंतून जातो. मात्र अशा प्रत्येक घटनेनंतर, समाज नेमका कोठे चालला आहे, हा एक प्रश्न मात्र अधिक तीव्रतेने समोर येतो. माणसाची सहनशक्ती, संवेदनशीलता आणि दुसऱ्याच्या वेदनांची जाणीव संपत चालली आहे का, या काळजीने मने व्यथित होत राहतात. गुन्हेगारी हा मानवी समाजसमूहास नवा विषय नाही. इतिहासात युद्धे, नरसंहार, अत्याचार आणि क्रौर्याची असंख्य उदाहरणे आढळतात. परंतु आधुनिक काळातील काही गुन्ह्यांचे स्वरूप वेगळे आहे. या घटनांमध्ये केवळ हिंसा नाही, तर थंड डोक्याने केलेले नियोजन, दुसऱ्याच्या जीवनाबद्दलची पूर्ण बेफिकिरी आणि पश्चात्तापाचा अभाव दिसून येतो. म्हणूनच या घटनांकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत पाहणे पुरेसे ठरणार नाही. कारण हा समाजाच्या सामूहिक मानसिकतेशी निगडीत असलेला प्रश्न ठरू पाहात आहे. पूर्वी कुटुंब, समाज, मित्रपरिवार किंवा धार्मिक, सांस्कृतिक मूल्यांच्या प्रभावामुळे या भावनांवर नियंत्रण ठेवले जात असे. आज समाज आणि व्यक्ती यांतील अंतर वाढत चालले आहे. संवाद कमी झाला आहे. अभिव्यक्तीचे माध्यम असलेल्या सोशल मीडिया नावाच्या आभासी जगात हजारो मित्र असले तरी मन मोकळे करण्यासाठी आधाराचा खांदा देणारी माणसे कमी होत आहेत. या बदलाच्या टप्प्यावर हिंसेबद्दलची संवेदनशीलता कमी होत असल्याचे जाणवत आहे. वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून दररोज समोर येणारी असंख्य हिंसक दृश्ये, हत्या, अपघात किंवा अत्याचाराच्या बातम्या जलदगतीने लोकांर्यंत पोहोचतात. एका बातमीने धक्का बसावा तोवर त्याहूनही धक्कादायक वाटणारी दुसरी बातमी आदळत असल्याने, कदाचित संवेदनशीलतादेखील बोथट होऊ लागल्या असून वाढती असहिष्णुता चिंताजनक असली तरी त्याकडे गांभीर्याने पाहण्याची मानसिकता कमी होऊ लागल्याने जाणवत आहे. मतभेद, अपयश, नकार किंवा टीका सहन करण्याची क्षमता कमी होताना दिसते. व्यक्तिकेंद्रीत मानसिकता नातेसंबंधांमध्येही दिसू लागल्याने, संवादाचे मार्ग खुंटत चालल्याने हिंसेचे मार्ग विस्तृत होत असावेत.
आर्थिक समस्या, बेरोजगारी, व्यसनाधीनता, मानसिक आरोग्याच्या समस्या, कुटुंबव्यवस्थेतील बदल आणि डिजिटल युगातील वेगवान जीवनशैली असे अनेक घटक बदलत्या मानसिकतेची ही विकृत पाळेमुळे पोसत असतात आणि अशा समस्या व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करतात, असे मानसशास्त्राचे विश्लेषक सांगतात. म्हणूनच, केवळ कायदे करून अशा घटना रोखता येणार नाहीत. महाराष्ट्रात गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. राज्याच्या गृहमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिलेल्या माहितीमुळे ही चिंता अधिक गडद झाली आहे. सरकारी उपाययोजना आणि कठोर कायदे कागदावरच आहेत की काय, असे वाटण्याजोगी ही आकडेवारी असल्याने, त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. गुन्हेगारांवरील दोषसिद्धीचे प्रमाण वाढले, शिक्षा देण्याचा वेग वाढला असे सांगून आपली पाठ थोपटून घेण्याचीही आता लाज वाटावी असे चित्र या आकडेवारीत दिसते. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण तर महाराष्ट्रात कमालीचे वाढले असून, संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती चिंता वाढविणारी आहे. महिलांवरील अत्याचार, बलात्कार, बालकांवरील अत्याचार, विनयभंग, मानसिक छळणूक आदी गुन्ह्यांमध्ये समाज भरडून निघत असेल, तर हे सुरक्षित जगण्याच्या हक्कावरील अतिक्रमण ठरते. त्यामुळेच, कठोर कायद्यांची नव्हे, तर मजबूत सामाजिक प्रतिबंधक यंत्रणेची आज खरी गरज आहे. सतर्क आणि संवेदनशील सरकारी यंत्रणा, भावनिक शिक्षण आणि संस्कार, कौटुंबिक संवाद, मानसिक आरोग्याबाबत खुलेपणा, स्त्री-पुरुष समानतेचे संस्कार आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदार वापर यांवर अधिक भर द्यावा लागेल. कारण, कोणत्याही राज्याची आणि तेथील समाजाची ओळख त्याच्या विकासदराने किंवा उंच इमारतींनी ठरत नाही. समाजातील सर्वात दुर्बल, असुरक्षित आणि निराधार व्यक्ती किती सुरक्षित आहे यावर त्या राज्याच्या संस्कृतीची आणि सामाजिकतेची ओळख आधारलेली असते. राज्यात घडणाऱ्या क्रूर घटना ही केवळ गुन्हेगारीची आकडेवारी नसून, समाजाच्या सामूहिक मनःस्थितीचे ते संकेत आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीच्या शर्यतीत आपण मानवी संवेदनांचा पाया दुर्बल होऊ देत आहोत का, याचा विचार करण्याचे संकेत या घटनांतून दिले जात आहेत.