महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Yellow alert for rain in Maharashtra महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून राज्यभर पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पावसाचा जोर वाढल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
 
yellow aler
 
मुंबईसह कोकण पट्ट्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेषतः मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच घाटमाथा आणि डोंगराळ भागांतही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
 
 
दरम्यान, पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. अनेक भागांत पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे खरीप हंगामासाठी आशादायक चित्र निर्माण झाले आहे.पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे विविध साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छतेची काळजी घेणे, पिण्याच्या पाण्याची स्वच्छता राखणे आणि आरोग्याबाबत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यभर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.