मालवण,
25 year old man dies मालवणमधील एका रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये झालेल्या धक्कादायक घटनेत २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना उंचावरून पूलमध्ये उडी मारताना घडल्याची माहिती समोर आली असून या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील श्रेणिक टाकळे हा तरुण काही मित्रांसोबत मालवण येथील एका रिसॉर्टमध्ये गेला होता. स्विमिंग पूलमध्ये मजा-मस्ती सुरू असताना त्याने उंच भागातून पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याची खोली कमी असल्याने त्याचे डोके थेट तळाशी जोरात आदळले आणि त्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर उपस्थितांनी त्याला तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी शोक व्यक्त करताना स्विमिंग पूलमध्ये निष्काळजीपणा किती धोकादायक ठरू शकतो याकडे लक्ष वेधले आहे. या घटनेनंतर सुरक्षा नियम आणि खबरदारी यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.