प्रशासकाच्या नवस पूर्ती
हिंगणघाट,
Ajansara Sarpanch Sanghatan विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या आजनसरा येथे हिंगणघाट तालुका सरपंच संघटनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक सेवा प्रितिष्ठान हॉलमध्ये आयोजित सरपंच संघटनेच्या बैठकीत सरपंच संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र राऊत, आजनसरा देवस्थानचे अध्यक्ष डॉ विजय पर्बत, सरपंच संघटनेचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विलास नवघरे, मुरलीधर चौधरी, आजनसरा येथील प्रशासक श्रावण काचोडे, नामदेव राऊत, कीर्ती सवाई, संतोष सेलूकर, सतिश ठाकरे,आदी प्रामुख्याने उपस्थित होते. धर्मेंद्र राऊत यांचा हिंगणघाट तालुका सरपंच संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राऊत मार्गदर्शन करताना म्हणाले की, सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हातील २ वर्षांपासून रीत असलेल्या ग्रामपंचायतीवर ३१५ माजी सरपंच प्रशासन नियुक्ती होण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ते ३१५ सरपंच जर प्रशासक म्हणून नियुक्ती झाले तर आम्ही संत भोजाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद गावाचा विकास करू असा नवस केला होता. संत भोजाजी महाराज यांच्या कृपेने हे साध्य झाले आहे. सरपंच संघटना गेल्या अनेक वर्षांपासून सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या समस्या शासन दरबारी ठामपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देत आहे. सोबतच सर्व गावांचे विकास व्हावे गावातील लोकांना मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी व शेतकर्यांना समस्या दूर करण्यासाठी निरंतर कार्य करीत आहे. जिल्हातील ३१५ सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यासाठी काय काय करावे लागले याची जाणीव सरपंच प्रशासकांना करून देत त्यांनी सरपंच संघटना, सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांच्या हक्कासाठी प्रत्येकवेळी जोमाने लढणार असे प्रतिपादन केले.