व्यसनमुक्त समाजासाठी सरसावले पोलिस दादा!

- जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
Arjuni Morgaon Police जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या नेतृत्वात 26 जून रोजी शहरातून जनजागृती दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनामुळे समाजात निर्माण होणारे दुष्परिणाम, तरुणांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम तसेच व्यसनमुक्त समाजाची गरज याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
 

 Arjuni Morgaon Police 
अमली पदार्थांच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून, शारीरिक व मानसिक आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः तरुणांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे अकाली मृत्यूचे प्रमाणही वाढत आहेत. दरम्यान, पोलिस विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीतून अमली पदार्थांना जीवनातून कायमचे हद्दपार करा आणि निरोगी, सुदृढ व व्यसनमुक्त जीवनाचा स्वीकार करा, असा संदेश देण्यात आला. ही जनजागृती रॅली संपूर्ण नगरातून मार्गक्रमण करत स्थानिक पोलिस ठाण्यात रॅलीचे समारोप करण्यात आले. यादरम्यान वाहतूक नियमांचे पालन, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर आणि सुरक्षित वाहन चालविण्याबाबतही संदेश देण्यात आला. रॅलीत पोलिस ठाण्यातील 3 अधिकारी व 32 पोलिस अंमलदार सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.