पुलगाव,
काँग्रेसच्या सत्तेला धोका दिसत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे संकट देशावर नसताना हुकूमशाही प्रवृत्तीने लोकशाहीची हत्या करत इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लागली. यावेळी घटनेची पायमल्ली तर करण्यात आलीच. परंतु, कायदा हातात घेऊन सर्वसामान्य जनतेचा अपरिमित छळ करण्यात आला. वृत्तपत्रे, न्यायव्यवस्था यांना वेठीस धरण्यात आले होते. तरीसुद्धा काँग्रेस नेते आजही भारतीय जनता पक्षावर संविधान धोक्यात आल्याचे आरोप करतात, ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य Avinash Bhope अविनाश भोपे यांनी केले.
देवळी ग्रामीण मंडळाच्या वतीने वाफगाव येथील विठ्ठल रुख्मिणी देवस्थानच्या सभागृहात आणीबाणी संविधान हत्या दिवस कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपा देवळी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल खडसे होते. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय बिंदोड प्रामुख्याने उपस्थित होते. भोपे पुढे म्हणाले की, आणीबाणीच्या काळात अनेक परिवारांनी हालअपेष्ठा सहन केल्या. घरातील कर्ता पुरुष तुरुंगात गेल्यामुळे घरातील विद्यार्थी, महिला यांना विपरीत परिस्थितीत जीवन जगावे लागले. आजही अनेक परिवार हलाखीचे जीवन जगत आहे. परंतु सत्तेचा लाभ मिळावा, म्हणून कधी अपेक्षा व्यक्त केली नाही. असु आम्ही सुखाने पत्थर पायातीलया पवित्र भावनेने संघटनेसाठी समर्पण करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा सन्मान करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, यासाठी आणीबाणीचा संविधान हत्या दिवस कार्यक्रम प्रत्येक मंडळस्थानी घेतला जात असल्याचे ते म्हणाले. स्वप्निल खडसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत काळबांडे, दिवाकर लोखंडे व पार्वतीबाई परतपुढे यांचा या लोकतंत्र सेनानींचा सत्कार करण्यात आला. संचालन ज्ञानेश्वर कवडे यांनी केले तर प्रमिला चोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या.