मुंबई
deul band 2 प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ सध्या यशाच्या उच्च शिखरावर असून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मराठी सिनेमे ज्या प्रमाणात यशाची नवी शिखरे गाठत आहेत, त्याचप्रमाणे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीही नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे. ‘देऊळ बंद २’ने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या पाच आठवड्यांत ९८.७० कोटी रुपयांची कमाई केली असून, १०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आता केवळ १.३० कोटी रुपयांची गरज आहे. हा टप्पा पार केल्यानंतर १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा हा मराठी चित्रपटसृष्टीतील तिसरा चित्रपट ठरणार आहे.
चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा अधिकृतपणे गाठण्यापूर्वीच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांकडून दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे कौतुक करण्यात येत आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर प्रवीण तरडे यांच्यासाठी भावनिक पोस्ट शेअर करत त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
लांजेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “‘देऊळ बंद २’ने १०० कोटींचा टप्पा पूर्ण केला, ही बातमी ऐकताना मनापासून आनंद झाला. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा केवळ एक व्यावसायिक आकडा नाही; हा आपल्या मातीतल्या कथांवर, आपल्या मातीतल्या कलाकारांवर आणि आपल्या मातीतल्या प्रेक्षकांच्या भावविश्वावर ठेवलेल्या विश्वासाचा विजय आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल परमस्नेही प्रवीण दादा यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
प्रवीण दादा हे नाव घेतलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो मातीचा गंध. त्यांची भाषा मातीची, त्यांचा स्वभाव मातीचा, त्यांची पात्रं मातीची आणि त्यांची कथाही थेट माणसाच्या मनातून उगवलेली असते. ते जे काही करतात, त्यात कृत्रिमपणा नसतो; त्यात घाम असतो, श्रद्धा असते, संघर्ष असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी असते. ‘देऊळ बंद २’ने तेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे.
प्रवीण दादांबद्दलची एक deul band 2 आठवण माझ्या मनात कायम जपून ठेवण्यासारखी आहे. ‘मुक्ताई’मध्ये वारकरी परंपरेचा मान राखण्यासाठी त्यांनी विनामूल्य भूमिका केली होती. हा केवळ एका कलाकाराचा सहभाग नव्हता; ती त्या परंपरेप्रती असलेली त्यांची निष्ठा, संतविचारांविषयीचा आदर आणि आपल्या संस्कृतीशी असलेली प्रामाणिक बांधिलकी होती. आजच्या काळात प्रत्येक गोष्टीचे व्यावसायिक मोजमाप होत असताना त्यांनी दाखवलेला हा भाव माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. कारण अशा कृती शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असतात.
प्रवीण दादा भेटले की नेहमी एक आपलेपणा जाणवतो. त्यांच्या बोलण्यात रांगडेपणा असला तरी मनात विलक्षण संवेदनशीलता आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद २’च्या १०० कोटींच्या यशाचा आनंद माझ्यासाठी केवळ शुभेच्छांचा विषय नाही; तो आपल्या माणसाच्या विजयाचा अभिमान आहे. मराठी चित्रपटसृष्टीला आज अशा यशांची गरज आहे. कारण ही यशं सांगतात की आपली भाषा, आपली माती, आपली श्रद्धा, आपले संघर्ष आणि आपले कलाकार यांच्यात अजूनही अफाट ताकद आहे. फक्त ती प्रामाणिकपणे पडद्यावर यायला हवी. प्रवीण दादांनी ही प्रामाणिकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्यांच्या या प्रवासाला त्यांच्या अर्धांगिनी विदुषी स्नेहलताई यांचीही मोलाची साथ लाभली आहे.प्रवीण दादा, तुमच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. तुमचं हे यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणादायी असून आमच्यासारख्या सहप्रवाशांसाठी अभिमानाची बाब आहे. तुमच्या हातून अशीच मातीशी जोडलेली, माणसांच्या मनात घर करणारी आणि मराठी सिनेमाचा झेंडा उंच नेणारी कलाकृती सातत्याने घडत राहो, हीच मनापासून शुभेच्छा.”दिग्पाल लांजेकर यांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून चाहत्यांकडून तिचे कौतुक होत आहे. यासोबतच प्रवीण तरडे आणि ‘देऊळ बंद २’च्या संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्या हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून, लवकरच १०० कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.