व्हेनेझुएलात भूकंपाचा दुहेरी तडाखा; ५० हजारांहून अधिक बेपत्ता

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
कॅराकस,
Double earthquake strike in Venezuela व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपानंतरही धक्क्यांची मालिका सुरूच असून शुक्रवारी पुन्हा एकदा जोरदार भूकंपाचा धक्का जाणवला. देशाच्या उत्तर किनारपट्टीजवळ रिश्टर स्केलवर ४.९ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. या धक्क्यांमुळे राजधानी कॅराकस तसेच माराके शहर हादरले. अचानक बसलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली.या नव्या धक्क्यांमुळे आधीपासून सुरू असलेल्या बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके शर्थीचे प्रयत्न करत असतानाच पुन्हा भूकंप झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
 
 
strike in Venezuela
 
याआधी बुधवारी संध्याकाळी व्हेनेझुएलामध्ये दोन शक्तिशाली भूकंप झाले होते. या भीषण आपत्तीत आतापर्यंत किमान ९२० जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. हजारो लोक जखमी झाले असून अनेक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. या भीषण धक्क्यांमुळे राजधानी कॅराकसचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे.बुधवारी झालेला भूकंप हा गेल्या १२५ वर्षांतील व्हेनेझुएलातील सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात आहे. या आपत्तीने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अनेक उंच इमारती क्षणात जमीनदोस्त झाल्या, संपूर्ण वसाहती उद्ध्वस्त झाल्या आणि हजारो कुटुंबांचे संसार मातीखाली गाडले गेले.
 
 
मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. अनेक कुटुंबीय ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. अनेक लोक आपल्या कुटुंबांपासून विभक्त झाले असून अनेक ठिकाणी हृदयद्रावक दृश्ये पाहायला मिळत आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ अमेरिकाच्या अंदाजानुसार मृत आणि जखमींची एकूण संख्या १० हजारांच्या पुढे जाऊ शकते. आतापर्यंत किमान ३,३६० जण जखमी झाल्याची माहिती आहे, तर १७२ हून अधिक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. व्हेनेझुएला सरकारने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता लोकांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. बचाव पथके युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत असून प्रत्येक क्षण महत्त्वाचा मानला जात आहे. देशभरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.