खडकीत शिरले पुराचे पाणी

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
मुख्य जलवाहिनीही वाहून गेली
 
तळेगाव (श्या.पंत), 
Floodwaters entered Khadki आष्टी शहीद तालुयातील खडकी येथे २६ रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांच्या भींती पडल्या असुन नाल्याचे पाणी गावात घुसल्याने घरांचेही नुकसान झाले. गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिणीही या पुरात वाहून गेली. आष्टी तालुयातील खडकी येथे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातून वाहणार्‍या नाल्याला पूर आला. उन्हाळ्यात ग्रामपंचायतने या नाल्याची स्वच्छता न केल्याने नाल्याला आलेल्या पुराचे पाणी गावात घुसले. त्यामुळे नाल्याच्या काठावर राहणार्‍यांचे नुकसान झाले. काही गावकर्‍यांना घरकुल मिळाल्यामुळे शासनाकडून रॉयल्टीची रेती आणली होती.
 
 
khadaki
 
ती लाखो रुपयाची रेती वाहून गेली. यासोबतच घरकुलासाठी आणलेल्या विटा, गिट्टी, सळाखा सुद्धा वाहून गेल्या. तसेच काही लोकांच्या मातीच्या भिंती कोसळल्या. गोठ्यात पाणी शिरल्याने गुरांचा चारा सुद्धा वाहून गेला. नदी नाल्याचा कचरा गावाच्या मुख्य पुलामध्ये अडकून पडला. त्यामुळे पाण्याने गावातून रस्ता काढला. पुरामुळे गावातील पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीही वाहून गेली. त्यामुळे सध्या परिस्थितीत गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही. गावातील विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. काही शेतकर्‍यांचे स्प्रिंकलर पाईप, बैलबंडी, ट्रॅटर, शेतीची अवजारे सुद्धा या पाण्यात वाहून गेले. पहिल्याच पाण्यात आलेल्या या पुरामुळे खडकीत झालेला हा हा:हा:कार पाहून अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे त्यामुळे पुढे या गावाचे कसे होईल हा प्रश्न गावकर्‍यांनी उपस्थित केला. उन्हाळ्यात ग्रामपंचायतने नाल्याचे खोलीकरण व साफसफाई केली असती तर ही परिस्थिती ओढवली नसती असा गावकर्‍यांचा आरोप आहे. पावसाच्या पहिल्याच पाण्यामुळे नागरिकांना या समस्याला समोर जावे लागले.