भीमनगर-सिंगलटोलीतील अंडरपासचे काम नागरिकांनी रोखले

उड्डाणपुलाच्या मागणीसाठी आंदोलन

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
गोंदिया,
Gondia underpass protest शहरातील भीमनगर, सिंगलटोली आणि आंबेडकर वॉर्ड परिसरातील नागरिकांनी शनिवारी 27 जून रोजी सामाजिक कार्यकर्ते अमितकुमार भालेराव यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर सुरू असलेल्या रेल्वेअंडरपास (सबवे) बांधकामाला विरोध करत काम बंद पाडले. तर या ठिकाणी अंडरपासऐवजी रेल्वे उड्डाणपूल (ओव्हरब्रिज) उभारण्याची मागणी करून काम सुरु केल्यास रेलरोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.
 

Gondia underpass protest 
यावेळी भालेराव यांनी सांगितले की, नागपूर-रायपूर आणि गोंदिया-चंद्रपूर या दोन रेल्वेमार्गांच्या मधोमध हा दाट लोकवस्तीचा परिसर असून येथे शाळा, डी.एड.-बी.एड. महाविद्यालये तसेच लघुउद्योग आहेत. असे असताना रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांच्या सोयींचा विचार न करता अंडरपासचे काम सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी नागपूर-रायपूर रेल्वेमार्गावर कमी उंचीचा अंडरपास निर्माण करण्यात आल्याने या परिसरातून मोठ्या वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. शाळेच्या बसेस, रुग्णवाहिका, बांधकामासाठी लागणारे ट्रक, जेसीबी, बोअरवेल यंत्रणा तसेच वीज विभागाच्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता चंद्रपूर रेल्वेमार्गावरही अंडरपास झाल्यास परिसरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ विभाग अभियंता मल्लिकार्जुन राव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना यापूर्वीही विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) नागपूर आणि जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन दिल्याचे सांगून रेल्वेकडे पुरेशी जागा उपलब्ध असताना अंडरपासऐवजी उड्डाणपूल का उभारला जात नाही, असा सवाल उपस्थित केला. तर गोंदिया स्थानक ते हिरडामालीदरम्यान सुरू असलेल्या दुहेरी रेल्वेमार्गाच्या कामाबाबतही नागरिकांनी आक्षेप नोंदवत शहराच्या मध्यभागातून एकेरी मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली. नागरिकांचा तीव्र विरोध पाहता राव यांनी अंडरपासचे काम तात्पुरते थांबविण्याचे निर्देश दिले. तसेच हा विषय वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर मांडून नागरिकांच्या मागण्यांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने पुन्हा अंडरपासचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास हजारो नागरिकांसह तीव्र जनआंदोलन करण्याचा तसेच आवश्यकता भासल्यास ‘रेल रोको’ आंदोलन करण्याचाही इशारा नागरिकांनी दिला.