वरोडा,
Ishwari Raut volleyball वरोडा शहराच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करीत लोकशिक्षण संस्था आणि वरोडा स्पोर्ट्स फाऊंडेशनची खेळाडू ईश्वरी विलास राऊत हिने वरोडा शहराचे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचविले आहे. थायलंड येथे होणार्या ज्युनियर आशियाई व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली आहे.
ईश्वरीच्या रूपाने 27 वर्षांनंतर वरोड्यातील खेळाडूला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. यापूर्वी सज्जिया शेख आणि मणीमूर्ती बच्चू या लोकमान्य कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीची सिंगापूर येथे झालेल्या शालेय आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती.
ईश्वरी ही लोकशिक्षण संस्थेची माजी विद्यार्थिनी असून, व्हॉलीबॉलमधील तिच्या सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तिने राष्ट्रीय स्तरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. सध्या ती विशाखापट्टणम येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात उच्चस्तरीय प्रशिक्षण घेत असून, तिच्या कठोर परिश्रमामुळे तिची थायलंड येथे 1 जुलैपासून होणार्या भारतीय संघात निवड झाली आहे.
लोकशिक्षण संस्थेचे Ishwari Raut volleyball अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, डब्ल्यूएसएफचे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांनी ईश्वरीचे कौतुक केले आहे. ईश्वरीने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, अॅड. दुष्यंत देशपांडे, प्रशिक्षक सुनील बांगडे, तालुका क्रीडा अधिकारी निखिल बोबडे, मुख्याध्यापक संजय आंबुलकर, गणेश मुसळे, देवानंद डुकरे, दुष्यंत लांडगे, तसेच आई-वडील आणि डब्ल्यूएसएफच्या ज्येष्ठ खेळाडूंना दिले आहे.