टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
मुंबई
kamali मराठी टेलिव्हिजन विश्वातील टीआरपीच्या शर्यतीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर अधिराज्य गाजवत होती. मात्र, आता या शर्यतीत मोठा बदल झाला असून झी मराठीवरील ‘कमळी’ने ‘ठरलं तर मग’ला मागे टाकत महाराष्ट्रातील नंबर वन मालिका होण्याचा मान मिळवला आहे.
 

kamali-no-1-marathi-serial-trp 
‘कमळी’च्या कथानकात सातत्याने येणारी नवी वळणं, प्रमुख कलाकारांचा दमदार अभिनय आणि भावनिक प्रसंग यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्याचा थेट परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाला असून, मालिकेने अव्वल स्थान पटकावले आहे. या यशानंतर ‘कमळी’च्या संपूर्ण टीमवर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. झी मराठीने अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती जाहीर केली आहे.
या आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत कोण बाजी मारणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर ‘कमळी’ने तब्बल साडेतीन वर्षांचा विक्रम मोडीत काढत मराठी मालिकांच्या टीआरपी यादीत पहिले स्थान मिळवले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल झी मराठीने मालिकेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
झी मराठीने शेअर केलेल्या kamali  पोस्टमध्ये म्हटले आहे, “तिने घर केलं प्रत्येकाच्या मनामनांत, ‘कमळी’ ठरली एक नंबर संपूर्ण महाराष्ट्रात! ३.८ TVR सह मराठी मालिकांमध्ये कमळीचा नंबर पहिला.”या घोषणेनंतर सोशल मीडियावर मालिकेच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. झी मराठीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला असून, “वाह मस्त…”, “आले शंभर… गेले शंभर… कमळी ठरली एक नंबर”, “नंबर वन म्हणजे… ‘ठरलं तर मग’ला मागे टाकून ‘कमळी’ने करून दाखवलं”, “वाह! याला म्हणतात टीआरपी” अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत मालिकेच्या यशाचे भरभरून कौतुक केले आहे.