१५ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
बीड,
maharashtra crime बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १५ वर्षांच्या शाळकरी मुलीची तपासणी केल्यानंतर ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आणि काही वेळातच तिने बाळाला जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकारानंतर पुढे आलेल्या तपशीलांनी परिसर हादरून गेला असून पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
 

maharashtra crime  
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीड–अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या एका शाळेत शिक्षण घेत होती. सुमारे वर्षभरापूर्वी ती नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिला ‘गावात सोडतो’ असे आमिष दाखवत आपल्या वाहनात बसवले. त्यानंतर तिचे डोळे बांधून तिला महामार्गालगत असलेल्या निर्जन स्थळी नेण्यात आले आणि तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने तिला धमकावल्याने घाबरलेल्या मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितला नव्हता.
दरम्यान, गेल्या वर्षभरात मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत ती गुपचूप राहत होती. दोन दिवसांपूर्वी तिच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्याने तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे पालकांनी तिला तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता ती पूर्ण दिवसांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर काही वेळातच तिची प्रसूती झाली आणि तिने बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तत्काळ अंभोरा पोलिसांना माहिती दिली.
ही माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत पीडित मुलीचा जबाब नोंदवला आणि तपास सुरू केला. त्यानंतर अज्ञात नराधमाविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 65 (1) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘पोक्सो’ अंतर्गत कलम 4 आणि 8 नुसार गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेनंतर अनेक प्रश्न maharashtra crime  उपस्थित झाले आहेत. गेल्या वर्षभरात मुलगी गप्प का राहिली, तिला कोणाकडून ब्लॅकमेल किंवा धमक्या मिळाल्या होत्या का, तसेच तिच्या शारीरिक स्थितीतील बदल कुटुंबीयांच्या लक्षात कसे आले नाहीत, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली असून लवकरच त्याला अटक करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा विश्वास अंभोरा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे करत आहेत.