मुंबई
monsoon alert महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. कोकण ते विदर्भ अशा विस्तृत पट्ट्यात पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. हवामान विभागाने आज पुन्हा एकदा राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून बहुतांश ठिकाणी ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण विभागात मान्सून पूर्णतः सक्रिय असून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात आज पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या भागात कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही ढगाळ हवामान कायम असून पुढील 48 तास महत्त्वाचे ठरणार आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत वेगवान वारे आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्याच्या भागात वाऱ्याचा वेग अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रातही पावसाची स्थिती सक्रिय झाली असून नाशिकमध्ये आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून पुढील काही काळ हीच हवामानस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यातही हवामानात monsoon alert लक्षणीय बदल दिसून येत असून छत्रपती संभाजीनगरसह सर्व जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 72 तासांसाठी या भागात वेगवान वारे आणि विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या काळात ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील आणि तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल.विदर्भात, विशेषतः नागपूरसह अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून या कालावधीत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे. येथे दिवसा तापमान सुमारे 38 अंश सेल्सिअस तर रात्री 24 ते 28 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.एकूणच राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने सर्व भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर हवामानात पुन्हा बदल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरी वर्ग काहीसा सुखावला असून पाऊस झालेल्या भागांत पेरणीची लगबग सुरू झाली आहे.