समुद्रपूर,
Mandgaon's saline water मांडगाव येथील क्षारयुत (खारट) पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येविरोधात अनेक वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते विक्की गुलाब घुसे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या ज्वलंत प्रश्नाची प्रशासनाने दखल घेत उपाययोजनांच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. मांडगाव येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून क्षारयुत पाणी पिण्याची वेळ येत होती. नळाद्वारे होणार्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.
अनेक घरांमध्ये पाण्याची चव खारट असल्याने ते पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत होत्या. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अनेकांना पर्यायी पाण्याच्या स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागत होते तर काहींना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत होते. या गंभीर परिस्थितीत ग्रामस्थांच्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम विक्की घुसे यांनी हाती घेतले. त्यांनी केवळ तक्रारी केल्या नाहीत तर संबंधित शासकीय विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रशासनालाही या प्रश्नाची गंभीरता लक्षात घ्यावी लागली. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या या प्रश्नावर आता संबंधित विभागाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, तांत्रिक पाहणी, जलस्रोतांचे परीक्षण आणि नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.