अनिल कांबळे
नागपूर ,
bank account safety मोबाईल हरविल्यानंतर अनेक जण मोबाईल परत मिळण्याची वाट बघत बसतात. तेथेच घोळ होतो. मोबाईल हरविल्यानंतर लगेच पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करा तसेच बँकेत जाऊन आपले बँक खाते फ्रीज करा, अन्यथा सायबर गुन्हेगार आपल्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून खाते रिकामे करु शकतात. मोबाईल हरविल्यानंतर थेट बँक खात्यातून संपूर्ण रक्कम लंपास होण्याचा धोका आहे. त्यामुळे मोबाईल हरवणे म्हणजे केवळ नवीन फोन खरेदी करण्याचा प्रश्न नसून, आर्थिक फसवणुकीचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्ती वापरून नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे लंपास करीत आहेत. नागपूर पोलिस दलातील पोलिस अधिकारी सागर आव्हाड हे सायबर गुन्हेगाराला अटक करायला दिल्लीला गेले असता त्यांचा मोबाईल हरवल्यानंतर त्यांना सायबर गुन्हेगारांनी दीड लाखाने गंडा घातला. त्यांनी तातडीने सिम कार्ड बंद केले नाही किंवा बँकेला माहिती दिली नाही. याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी मोबाईलचा ॲक्सेस मिळवून युपीआय ॲपच्या माध्यमातून त्याच्या बँक खात्यातून पैसे काढले.
सायबर गुन्हेगार मोबाईल हरवलेल्या व्यक्तींच्या निष्काळजीपणाचा फायदा घेतात. विशेषतः सिम कार्ड सक्रिय राहिल्यास आटोपीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे त्यांना सोपे जाते. त्यामुळे मोबाईल हरवताच "नंतर पाहू" असा विचार न करता काही मिनिटांतच सिम ब्लॉक करणे, बँक खाते सुरक्षित करणे आणि युपीआय सेवा बंद करणे आवश्यक आहे. मोबाईलमध्ये आपली खासगी माहिती असते. तसेच मोबाईल नंबर (सीमकार्ड) बँक खाते, युपीआय- गुगल पे, फोन पे तसेच विविध बँकेचे ॲपशी कनेक्ट असतात. त्यामुळे मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरी गेल्यानंतर सायबर गुन्हेगार सीमकार्डचा गैरवापर करुन युपीआय ॲपद्वारे पैसे ट्रान्सफर करणे, बँकेचे ओटीपी प्राप्त करून व्यवहार पूर्ण करणे, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सह अन्य सोशल मीडियाचा गैरवापर करणे, संपर्कातील व्यक्तींना पैसे मागण्याचे मेसेज पाठवणे, ई-मेल आणि इतर खात्यांचे पासवर्ड बदलवणे, फोटो गॅलरीतील वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर अशी गैरकायदेशिर कामे सायबर गुन्हेगार करु शकतात, त्यामुळे मोबाईल हरविल्यानंतर दुर्लक्ष केल्यास थेट बँक खाते रिकामे होण्याचा धोका आहे.
मोबाईल हरवला...हे करा
-मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून सिम कार्ड बंद करून घ्या.
- बँकेच्या हेल्पलाईनवर फोन करून डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि युपीआय व्यवहार बंद करा
- फोन पे, गुपल पे, पेटीएम, भीम यांसारख्या ॲपशी संबंधित बँकेला माहिती देऊन युपीआय आयडी निष्क्रिय करा.
- मोबाईल ‘फाईंड माय डिव्हाईस’ ही सेटिंग करा:
- मोबाईलवरील ट्रॅकिंग सुविधेच्या मदतीने फोन लॉक करा किंवा त्यातील सर्व माहिती डिलीट करा.
- ई-मेल, इंटरनेट बँकिंग, सोशल मीडिया आणि इतर खात्यांचे पासवर्ड तात्काळ बदला.
- जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा.
... ही घ्या काळजी
मोबाईल वापरताना काही सुरक्षिततेचे उपाय केल्यास सायबर गुन्हेगारांपासून बचाव होऊ शकतो. मोबाईलला मजबूत पीन किंवा पासवर्ड ठेवा. फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक सुरू ठेवा. युपीआय ॲपसाठी स्वतंत्र पासकोड वापरा. बँकिंग ॲपमध्ये ऑटो-लॉगिन टाळा. नियमित डेटा बॅकअप घ्या. आयएमईआय क्रमांक सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवा. फोनमध्ये स्क्रीन लॉकशिवाय आर्थिक व्यवहार करणारी ॲपप्स उघडी ठेवू नका. या सर्व सेटिंग सुरु केल्यास सायबर गुन्हेगाराला सहजासहजी फसवणूक करता येणार नाही.
मोबाईल हरवणे ही केवळ वस्तू हरवण्याची घटना नाही. तो तुमच्या आर्थिक आणि वैयक्तिक सुरक्षिततेशी संबंधित गंभीर विषय आहे. योग्य वेळी योग्य पावले उचलल्यास मोठी आर्थिक फसवणूक टाळता येऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहून डिजिटल सुरक्षिततेचे नियम पाळल्यास सायबर गुन्हेगारांचा डाव हाणून पाडता येईल.
- डॉ. अर्जून माने (सायबर तज्ञ)