मादक पदार्थांचे सेवन देश विकासातील अडसर

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
वेध
विजय कुळकर्णी 
Narcotics संपूर्ण जीवसृष्टीत मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. याचे   कारण म्हणजे मानवाचा विकास मेंदू आहे. मानवी शरीराची प्रत्येक   हालचाल, निर्णय आणि व्यवहार मेंदू नियंत्रित करतो. जर मेंदू योग्यरीतीने काम करीत नसेल तर मानवाचे अस्तित्व जिवंत प्रेतासारखेच होईल. दुर्दैवाची बाब म्हणजे नशा सर्वात प्रथम आणि जास्त प्रमाणात या मेंदूवरच आघात करते. मादक पदार्थांचे सेवन व्यक्तीच्या विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता हिरावून घेते. त्यामुळे चांगले-वाईट याचे भान त्याला राहात नाही. नशेत असलेल्या व्यक्तीला तो काय करीत आहे, याची सुतराम कल्पना नसते. त्यामुळे अनेक गुन्हेगारी घटनांमागे नशा हे प्रमुख कारण आढळते. नशापाणी करण्याच्या हव्यासापोटी लोक चोरी, लूट, हिंसा आणि इतर गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करतात. आर्थिक स्थिती खालावल्यामुळे अनेकदा एवढी भयंकर स्थिती निर्माण होते की, तो नशाबाज आपल्या परिवारातील सदस्यांशीही वाद, भांडण, मारामाऱ्या करू लागतो. नशेच्या हव्यासापायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहतो. निर्दोष लोकांना जीव गमाविण्याची वेळ येते. नशा केवळ मेंदूच नव्हे तर शरीराच्या इतर अवयवांनाही हळूहळू कमकुवत करते. त्याची परिणती शेवटी असाध्य आजार, महागडे उपचारांच्या रूपात दिसून पडते आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारणही बनते. तेव्हा, अमली पदार्थांचे सेवन करणे हे कोणत्याही प्रकारे मनोरंजनाचे साधन होऊच शकत नाही.
 
 
nasha mukshti
 
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व हक्क मंत्रालयामार्फत दरवर्षी नशा मुक्ती जागरूकता अभियान आयोजित केले जाते. यावर्षी १७ ते २६ जून या कालावधीत नशामुक्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत देशभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी जागतिक स्तरावर ‘ड्रग्ज समस्या : आव्हाने व समाधान’ या संकल्पनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा विषय यादृष्टीनेही महत्त्वाचा आहे की, मादक पदार्थांची उपलब्धता आणि पोहोच पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. लहान मुलांपासून युवक-वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे या समस्येच्या विळख्यात सापडत आहेत. काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये पाच महिन्याच्या कालावधीत पाच कोटींचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले. जर, केवळ एका शहरातील ही स्थिती असेल तर राज्य आणि देशात मादक पदार्थ सेवन करणारे आणि त्याची तस्करी करणारे रॅकेट किती व्यापक असेल, याचे गांभीर्य लक्षात येते.
 
 
Narcotics  काही लोक दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी, मानसिक ताण घालविण्यासाठी नशेचा आधार घेतात. त्यावेळी शिक्षणाचा अभाव व मनोरंजनाची मर्यादित साधने यामुळे ही धारणा बनली होती. मात्र, आता शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. मनोरंजनाची साधन उपलब्ध आहेत. तरीही, मोठ्या संख्येत युवक आधुनिकता आणि मौज मस्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा म्हणून याकडे पाहतात. ही बाबत अत्यंत चिंताजनक आहे. रणधीर कपूरच्या एका जुन्या चित्रपटातील गाणं यानिमित्ताने आठवते, ‘पिने वालोंको पिने का बहाना चाहिये।’ या गाण्यात दारू पिण्यासाठी किती कारणं उपलब्ध असतात ते सांगितलं आहे. उच्च प्रतिची मिळाली नाही तर हातभट्टीची चालेल, असेही त्या गाण्यात वर्णन केले आहे. नशाबाज व्यक्तीला नेहमी सामाजिक अपमान, भावनात्मक पीडा सहन करावी लागते. नशेची सवय त्याला हळूहळू त्याच्या जबाबदाऱ्यांपासून दूर करते. तो आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात अपयशी ठरतो. परिवारातील सदस्य असुरक्षित समजू लागतात. कुटुंब प्रमुखच अमली पदार्थांच्या आहारी गेला तर त्या कुटुंबावरच संकट ओढवते. नशा केवळ व्यक्ती, परिवार, समाजच नव्हे तर देशाच्या विकासातील मोठा अडसर आहेत. मुले व किशोरवयीनांना नशेपासून दूर ठेवणे ही पालकांची प्रमुख जबाबदारी आहे. केवळ मुलांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देणे एवढ्यावरच न थांबता पालकांनी आपला मुलगा, मुलगी कुठे जाते, त्याचे मित्र कसे आहेत. ते दिवसभर काय करतात याकडेदेखील लक्ष ठेवणे आवश्यक आहे. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी अतिकठोर कायदे करणे गरजेचे आहेत. नशेच्या गर्तेत सापडलेल्यांसाठी उपचार, पुनर्वसन आणि भावनात्मक सहकार्याची आवश्यकता आहे. तणाव, एकटेपणा, चिंता, सामाजिक दबाव आणि मानसिक अस्थिरता इत्यादी कारणं युवकांना नशा करण्यास उद्युक्त करतात. नशामुक्त भारत अभियानांतर्गत नशा मुक्ती केंद्र व पुनर्वसन, सहायता सेवा उपलब्ध आहेत. ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी १४४४६ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.
 
८८०६००६१४९