नाशिक
cidco nashik नाशिकच्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून लसीकरण शिबिरातून लस घेऊन बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. श्रावणी अनिल पाटील असे मृत मुलीचे नाव असून तिच्या मृत्यूमागे लसीकरण कारणीभूत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ही घटना २४ जून रोजी नाशिकच्या खुटवड नगर परिसरात घडली, जिथे घटसर्प आणि धनुर्वात यासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्रावणी पाटील ही वडिलांसोबत या शिबिरात लस घेण्यासाठी आली होती. लस घेतल्यानंतर ती तेथून निघाली आणि काही अंतर जाताच तिला अचानक चक्कर आली व ती खाली कोसळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
श्रावणीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. मात्र तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच ते समोर येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कुटुंबीयांनी थेट लसीकरणाकडे संशयाची बोट दाखवत तिच्या मृत्यूचे कारण लसीकरणच असल्याचा ठाम आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, श्रावणी सकाळी नाश्ता करून घरून लसीकरणासाठी निघाली होती. महापालिकेचे कर्मचारी घरी येऊन लसीकरणासाठी जाण्याबाबत सांगून गेले होते. त्यानंतर ती महापालिकेच्या वतीने आयोजित संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील शिबिरात दुपारी १२ ते १ दरम्यान गेली होती. लस घेतल्यानंतर ती जवळच असलेल्या मेडिकलमध्ये जात असताना काही मिनिटांतच तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.या घटनेनंतर श्रावणीच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र लसीकरणानंतरच मृत्यू झाल्यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध झालेली नाही. संबंधित लस एक्सपायरी होती का, असा प्रश्नही स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जर मृत्यू लसीकरणामुळे झाला नसेल, तर नेमके कारण काय असू शकते, असा प्रश्नही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेनंतर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून विविध स्तरांवर चर्चा आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत.