जम्मू-काश्मीर,
jammu and kashmir आज संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाच्या धक्क्यांनंतर अनेक ठिकाणी लोक घराबाहेर धावल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये होता आणि त्याची तीव्रता ६.२ इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंप सुमारे २१५ किलोमीटर खोल जमिनीत झाला असून तो शनिवारी संध्याकाळी ७:०४ वाजता जाणवला.

दरम्यान, जगाच्या दुसऱ्या भागात व्हेनेझुएलामध्येही काही दिवसांपूर्वी तीव्र भूकंपाचे धक्के बसले होते. दोन मोठ्या धक्क्यांनंतर तेथे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून मृतांचा आकडा ९२० पेक्षा जास्त झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हजारो लोक जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बचावकार्य अद्यापही सुरू आहे. भारत भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो, कारण देशातील सुमारे ५९ टक्के भूभाग भूकंपाच्या धोक्यात आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी भारताला चार झोनमध्ये विभागले असून झोन ५ सर्वात जास्त धोकादायक मानला जातो, तर झोन २ तुलनेने कमी धोक्याचा आहे. राजधानी दिल्ली झोन ४ मध्ये येते, जिथे मोठ्या तीव्रतेचे भूकंप होण्याचा धोका असतो. हिमालयीन पट्टा, ईशान्य भारत आणि कच्छसारखे भाग भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जातात.
भूकंप हे पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे होतात. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्या किंवा घर्षण झाल्यास ऊर्जा मुक्त होते आणि भूकंप निर्माण होतो. रिक्टर स्केलवर ६ ते ६.९ तीव्रतेचे भूकंप गंभीर मानले जातात आणि त्यात इमारतींना तडे जाण्याची शक्यता असते. या घटनेनंतर जम्मू-काश्मीर परिसरात सतर्कता ठेवण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.