दोन महिलांना अटक, देहव्यापार करणाऱ्या दोघींची सुटका
अनिल कांबळे
नागपूर,
Police raid a sex work den नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका निवासी फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकत येथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पदार्फाश केला आहे. कारवाईत पोलिसांनी दोन महिला एजंटना अटक केली असून, त्यांच्या तावडीतून दोन पीडित तरुणींची सुटका केली.
शुक्रवारी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला नंदनवन हद्दीतील एनआयटी कॉम्प्लेक्स, ब्लॉक ‘ए’ येथील फ्लॅट क्रमांक सत्रामध्ये बेकायदेशीर देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी येथे सापळा रचून धाड टाकली. येथे आरोपी शालिनी उर्फ वर्षा (३५) आणि अर्चना (४३) या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना बोलावून पीडित तरुणींकडून देहव्यापार करून घेताना सापडल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पीडित तरुणींची सुटका केली. तसेच आरोपींच्या ताब्यातून १ लाख ५०० रुपयांची रोकड, दोन मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नंदनवन पोलिस ठाण्यात आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना मुद्देमालासह नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.