पावसाचा रेड अलर्ट! बंगाल-सिक्कीममध्ये भूस्खलनाचा धोका

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Risk of landslides in Bengal and Sikkim देशभरात मान्सूनचा प्रभाव वेगाने वाढताना दिसत असून मध्य प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतातील सर्व राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या भागांमध्ये भूस्खलनाचा धोका वाढला असून प्रशासन सतर्क झाले आहे.दरम्यान, हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेक रस्ते आणि गल्ल्या पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः ढाली परिसरात परिस्थिती अधिक गंभीर बनली, जिथे नाल्यातील माती आणि ढिगाऱ्याखाली तीन वाहने अडकली. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने स्थानिकांचे नुकसान झाले.
 
 

Sikkim 
 
पावसाचा परिणाम वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात झाला. शाळा बंद असल्याने आणि कार्यालयीन वेळ संपल्यानंतर घरी परतणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे तासन्तास अडकून पडावे लागले. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास दाट ढग आणि मुसळधार पावसामुळे शहरात अंधाराचे वातावरण निर्माण झाले.या पावसामुळे शिमल्यातील निचरा व्यवस्थेतील त्रुटीही पुन्हा एकदा समोर आल्या. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले. त्यामुळे वाहनांची गती मंदावली आणि अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली.भारतीय हवामान विभागाने चंबा, शिमला, कुल्लू, मंडी आणि सिरमौर जिल्ह्यांसाठी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील सात दिवस राज्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
 
 
२६ ते ३० जून दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ३० जूनच्या रात्रीनंतर पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असून १ आणि २ जुलै रोजी डोंगराळ भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.प्रशासन आणि हवामान विभागाने पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्या, ओढे, भूस्खलन प्रवण क्षेत्रे आणि डोंगर उतारांच्या आसपास जाणे टाळावे तसेच खराब हवामानात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. याशिवाय छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या बहुतांश भागांमध्येही मान्सून दाखल झाला आहे. आता उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही लवकरच मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या अधिकृत आगमनापूर्वीच अनेक राज्यांमध्ये पावसाने जोर पकडल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत असला तरी काही भागांत त्याचा फटका बसत आहे.