भरपावसात देवळीत स्वागत
देवळी,
Shiv Sainik खासदार पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपत नाही. महाराष्ट्रातील जनतेचे प्रेम आणि कडवे, एकनिष्ठ शिवसैनिक हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. येणारा काळ आपलाच असून पक्ष सोडून गेलेल्यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल, असे विचार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे नागपूरवरून यवतमाळकडे जात असताना शुक्रवारी रात्री देवळी येथील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विश्रामगृह येथे थांबले. यावेळी वर्धा जिल्हा शिवसेनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. दौर्यास उशीर होऊनही भर पावसात शिवसैनिक ठाकरे यांच्या स्वागतासाठी प्रतीक्षा करत उभे होते.
संपर्कप्रमुख अशोक शिंदे, जिल्हाप्रमुख अनंत देशमुख आणि राजू खूपसरे यांच्या विनंतीवरून उद्धव ठाकरे यांनी देवळी येथे भेट दिली. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसैनिकांनीही आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी एकनिष्ठपणे काम राहण्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांना दिला. यावेळी देवळीचे नगराध्यक्ष किरण ठाकरे आणि प्रवीण कात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचा चरखा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.