एकच एजन्सी, हजारो ग्राहक; गॅससाठी महिनाभर प्रतीक्षा!

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
रंगय्यापल्ली,
Sironcha LPG gas shortage आवश्यक सेवेत मोडणार्‍या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. संपूर्ण तालुका ‘पलक एचपी गॅस ग्रामीण वितरक’ या एकमेव एजन्सीवर अवलंबून असताना, वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. ग्रामीण भागातून वारंवार एजन्सीच्या चकरा मारूनही रिकाम्या हाताने परतण्याची वेळ ग्राहकांवर येत आहे.
 

Sironcha LPG gas shortage 
 
तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वारंवार एजन्सीपर्यंत प्रवास करून ग्राहक एजन्सीत पोहोचतात. मात्र, कधी ओटीपी, कधी ईकेवायसी, तर कधी सिलेंडर लिमिट सेट करावी लागेल, सर्व्हर डाऊन आहे, अशी कारणे सांगितली जातात. ग्राहकांकडून अर्ज भरून घेतले जातात, आवश्यक कागदपत्रे जमा करून घेतली जातात, मात्र त्यानंतर संबंधित कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांना पुन्हा पुन्हा एजन्सीच्या फेर्‍या माराव्या लागत आहेत.
 
महिना उलटूनही सिलेंडर मिळत नसल्याने अनेक घरांतील स्वयंपाकघराचा गाडा विस्कळीत झाला आहे. एका सिलेंडरसाठी दिवसेंदिवस प्रतीक्षा, वारंवारचा प्रवास, मजुरीचे नुकसान आणि आर्थिक भुर्दंड सहन करूनही हातात सिलेंडर पडत नसल्याने नागरिकांचा संयम संपत चालला आहे. शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन प्रक्रिया सुविधेपेक्षा मनस्तापाचे कारण ठरत असल्याची भावना ग्राहकांतून व्यक्त होत आहे.
 
संपूर्ण तालुक्याची जबाबदारी Sironcha LPG gas shortage एकाच एजन्सीवर असताना वितरणाचे सक्षम नियोजन का केले जात नाही, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अत्यावश्यक सेवेत ग्राहकांना वेळेवर सेवा देण्याऐवजी वारंवार हेलपाटे मारायला लावले जात असल्याने एजन्सीतील कर्मचार्‍यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. आज या, उद्या या अशा उत्तरांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. हा हलगर्जीपणा तातडीने थांबवून वितरण व्यवस्था सुरळीत करावी, अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.