चंद्रपूर
suspicion about the mother चंद्रपूर शहरातील मित्रनगर चौकात गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या खळबळजनक हत्याकांडाचा रामनगर पोलिसांनी काही तासांतच छडा लावला आहे. या प्रकरणात १९ वर्षीय अजय उर्फ ॲपल शंकर पोहनकर याला अटक करण्यात आली असून मृत व्यक्तीची ओळख ४८ वर्षीय संतोष अरुण भेंडे (रा. अमरावती) अशी पटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री डायल-११२ वर मित्रनगर चौकात भांडण सुरू असल्याचा कॉल पोलिसांना आला. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना संतोष भेंडे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात समोर आले की, आरोपीने आधी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर मोठ्या दगडाने डोक्यावर वार करून हत्या केली.
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून, बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र आरोपी सापडला नाही. पुढे तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी वडगाव परिसरात लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिली असून त्याने सांगितले की, मृत व्यक्ती त्याच्या आईवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन घरात येऊन त्रास देत होता. याच रागातून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हत्येत झाले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हे प्रकरण कौटुंबिक वाद आणि संशयातून घडलेले दिसत असले तरी सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून काही तासांत गुन्हा उकलल्याने पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.