महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचा स्फोट; टीईटी परीक्षा रद्द
दिनांक :27-Jun-2026
Total Views |
मुंबई,
TET exam cancelled in Maharashtra. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांमधील पेपरफुटीचे सत्र पुन्हा एकदा समोर आले आहे. यावेळी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पेपरफुटीच्या विळख्यात अडकली असून रविवारी होणारी परीक्षा तातडीने स्थगित करण्यात आली आहे. पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून परीक्षार्थींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे परिसरात उद्याच्या परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काही जण आर्थिक व्यवहार करून विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितांवर नजर ठेवली आणि काही ठिकाणी छापे टाकून प्रश्नपत्रिका जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. पेपर नेमका कुठून लीक झाला, यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, तसेच कोचिंग क्लासेस किंवा शिक्षण विभागातील कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. सध्या तपासाच्या दृष्टीने संबंधितांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. आधीच टीईटी परीक्षेबाबत विविध कारणांमुळे वाद निर्माण झाले होते. अशात आता थेट पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण विभागाकडून लवकरच अधिकृत निवेदन जारी केले जाणार असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उद्याच्या परीक्षेसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी अनेक महिन्यांपासून मेहनत घेतली होती. मात्र, ऐनवेळी परीक्षा स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.