ठाणे,
Three arrested in TET paper leak case देशात नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाने मोठी खळबळ उडाल्यानंतर आता महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर लीक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली असून 28 जून, 2026 रोजी होणारी टीईटी परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत भिवंडी परिसरातून तिघांना अटक केली आहे. कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. सुरुवातीला कोनगाव येथील डायमंड हॉटेलमध्ये तपास करण्यात आला, मात्र संशयित तेथे आढळून आले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघांना ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासातच अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून टीईटी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी संबंधित प्रश्न आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर तिन्ही आरोपींना भिवंडी येथे आणण्यात आले असून त्यांच्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या घटनाक्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा पेपरफुटीच्या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नीट, एमपीएससी आणि आता टीईटी परीक्षांमध्ये वारंवार होत असलेल्या प्रकारांवरून राजकीय वातावरणही तापले आहे.
लवकरच नवीन तारीख जाहीर होणार
या प्रकरणावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेही अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. 28 जून, 2026 रोजी आयोजित टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परीक्षेबाबतची पुढील माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सुमारे 6 लाख 128 उमेदवारांना पुन्हा नोंदणी किंवा अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच येत्या 2 ते 3 दिवसांत टीईटी परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाणार असून राज्यातील 37 शहरांमधील 1028 परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.