नागपूर,
ramkrishna wagh college राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि बहुजनांच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या या थोर समाजसुधारकाला यावेळी आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे होते. व्यासपीठावर सर्व शाखा विभाग प्रमुख प्रा. दीपक ठाकरे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. किरण पांडे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हर्षल रोठे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, “राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे महान पुरस्कर्ते होते. दुर्बल व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे आचरण करून समाजात समानता आणि बंधुभाव निर्माण करणे ही काळाची गरज आहे.” सर्व शाखा विभाग प्रमुख प्रा. दीपक ठाकरे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक सचिव प्राचार्य डॉ. मारोती वाघ तसेच संस्थेच्या संचालिका प्राचार्या डॉ. लता वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पल्लवी खंडारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पायल पशीने यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोहिनी सोनवाणे यांनी केले. विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सौजन्य: सायली लाखे, संपर्क मित्र