ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर?

मार्को रुबियो यांचे मोठे संकेत

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump to visit India soon अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी संकेत दिले आहेत. शनिवारी वॉशिंग्टन डी.सी. येथे माध्यमांशी संवाद साधताना रुबियो यांनी भारत-अमेरिका संबंध अत्यंत मजबूत असल्याचे सांगत ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांवर विशेष भर दिला. मार्को रुबियो म्हणाले की, ट्रम्प यांचा भारत दौरा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी दोन्ही देशांमध्ये तयारी सुरू आहे. त्यांच्या मते, भारत हा अमेरिकेचा अत्यंत जवळचा मित्रदेश आणि महत्त्वाचा रणनीतिक भागीदार आहे. तसेच पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील मजबूत संबंध हे दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
 
Trump to visit India soon
 
 
जर हा दौरा निश्चित झाला, तर फेब्रुवारी 2020 नंतर ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा ठरेल. तसेच व्हाईट हाऊसमध्ये पुनरागमन केल्यानंतरचा हा त्यांचा पहिला भारत दौरा असेल. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची शेवटची भेट फ्रान्समधील जी-7 शिखर परिषदेदरम्यान झाली होती. तब्बल 16 महिन्यांनंतर झालेल्या या द्विपक्षीय बैठकीकडे जागतिक स्तरावर लक्ष लागले होते. ट्रम्प यांचा प्रस्तावित भारत दौरा अशा वेळी समोर येत आहे, जेव्हा भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारावर महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. मार्को रुबियो यांनी सांगितले की, या व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यांनी या चर्चेला सकारात्मक दिशा मिळत असल्याचेही स्पष्ट केले.
 
ऊर्जा सहकार्यावर भाष्य करताना रुबियो यांनी भारत आणि अमेरिका ऊर्जा पुरवठा वाढवण्यासाठी एकत्रितपणे काम करत असल्याचे सांगितले. विशेषतः जड कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या काही मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होत असल्याने ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणखी मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर पोहोचत असताना ट्रम्प यांच्या संभाव्य भारत दौऱ्याकडे आता दोन्ही देशांसह जागतिक समुदायाचे लक्ष लागले आहे.