मुंबई
urmila matondkar बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अभिनयासोबतच दमदार नृत्यशैलीच्या जोरावरही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘रंगीला गर्ल’ आणि ‘छम्मा छम्मा गर्ल’ म्हणून लोकप्रिय ठरलेल्या उर्मिलाच्या कारकिर्दीतील ‘छम्मा छम्मा’ हे गाणे आजही तितकेच गाजते. मात्र, या सुपरहिट गाण्यासाठी त्यांनी सुरुवातीला नकार देण्याचा निर्णय घेतला होता, असा धक्कादायक खुलासा त्यांनी नुकताच केला आहे.
अलीकडेच उर्मिला मातोंडकर ‘India’s Best Dancer’ या कार्यक्रमात विशेष पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी ‘China Gate’ चित्रपटातील ‘छम्मा छम्मा’ गाण्याच्या चित्रीकरणाशी निगडित अनेक आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, जेव्हा त्यांना ‘China Gate’मधील ‘छम्मा छम्मा’ गाण्याची ऑफर देण्यात आली आणि ते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटातील गाणे असल्याचे सांगण्यात आले, तेव्हा त्यांनी हे गाणे करण्यास जवळपास नकार दिला होता. त्या काळात चित्रपटसृष्टीत ‘आयटम साँग’कडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यामुळे अशा प्रकारच्या गाण्यात काम करण्याबाबत त्या सुरुवातीला साशंक होत्या.
याबाबत पुढे बोलताना उर्मिला यांनी सांगितले की, त्यानंतर दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पूर्वीही काही अशी गाणी झाली आहेत जी वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली असून ‘छम्मा छम्मा’ हेही असेच एक गाणे व्हावे, जे कायम लोकांच्या मनात घर करून राहील, अशी त्यांची इच्छा असल्याचे संतोषी यांनी सांगितले. त्यांच्या या शब्दांमुळे आपला दृष्टिकोन बदलला आणि त्यानंतर आपण हे गाणे स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे उर्मिला यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनीurmila matondkar ‘छम्मा छम्मा’च्या चित्रीकरणाशी संबंधित आणखी एक रंजक किस्साही सांगितला. शूटिंग सुरू होण्यापूर्वी त्यांनी कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना हे गाणे पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील, अशी विचारणा केली होती. त्यावर गणेश आचार्य यांनी अंदाजे १२ दिवस लागतील, असे सांगितले होते. मात्र, संपूर्ण टीमचे नियोजन, मेहनत आणि उत्कृष्ट समन्वय यामुळे एवढ्या मोठ्या गाण्याचे चित्रीकरण अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करण्यात आले.
१९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘China Gate’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नसले, तरी त्यातील ‘छम्मा छम्मा’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले. उर्मिला मातोंडकर यांच्या आकर्षक नृत्यशैलीने आणि प्रभावी सादरीकरणाने हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवून आहे.