बदायूं,
rape-of-a-child : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ६० वर्षांच्या वृद्धाने अवघ्या ४ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेतील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्याने गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या चकमकीत (एन्काउंटर) आरोपीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या आहेत.
२५ जून रोजी घडली होती घटना मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने २५ जून रोजी पीडित ४ वर्षीय मुलीला घराबाहेरून हूल देऊन पळवून नेले होते. त्यानंतर तिला जबरदस्तीने एका निर्जन शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपीने गंभीर अवस्थेतील मुलीला तिथेच सोडून पळ काढला. अतिरक्तस्रावामुळे पीडित मुलगी जागीच बेशुद्ध झाली होती. रात्र उलटूनही मुलगी घरी न परतल्याने हवालदिल झालेल्या पालकांनी तातडीने पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
गावकऱ्यांना सापडली चिमुरडी, जबानीवरून आरोपी निष्पन्न तपासादरम्यान गावातील काही नागरिकांना शेतात एक लहान मुलगी रक्ताळलेल्या आणि जखमी अवस्थेत आढळून आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर चिमुरडीने दिलेल्या जबानीच्या आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. आरोपी अबरार (वय ६० वर्षे) हा त्याच गावातील रहिवासी असल्याचे समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती.
पहाटे ४ वाजता पोलिसांचा 'हाफ एन्काउंटर' जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) अंकिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ४ च्या सुमारास पोलिसांनी आरोपी अबरारला पकडण्यासाठी सापळा रचला होता. पोलिसांचे पथक घेराव घालत असल्याचे पाहताच आरोपीने पोलिसांवर थेट गोळीबार केला. आत्मरक्षणासाठी आणि आरोपीला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी प्रत्युत्तरा दाखल गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अबरारच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या आणि तो जागीच कोसळला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले असून, सध्या त्याच्यावर पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या क्रूर घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.