अमरावतीकर वाहतूक कोंडीच्या विळख्यात
अमरावती,
Badnera Railway Flyover बडनेरा शहरातील नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला, नव्याने बांधकाम पूर्ण झालेला रेल्वे उड्डाणपूल अद्यापही वाहतुकीसाठी खुला न झाल्यामुळे बडनेरेकरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असतानाही केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे या पुलाचे अधिकृत लोकार्पण रखडले असल्याचा थेट आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
बडनेरा शहरातील हा नवीन रेल्वे उड्डाणपूल अमरावतीमधील दस्तुरनगर, औद्योगिक क्षेत्र, प्रसिद्ध कोंडेश्वर मंदिर, राष्ट्रीय महामार्ग आणि बडनेरा जुनी वस्ती या अत्यंत महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा मुख्य दुवा आहे. या उड्डाणपुलाच्या खालून रेल्वेची मुख्य लाईन जात असल्याने, येथील रेल्वे गेट वारंवार बंद करावे लागते. रेल्वे गेट बंद झाल्यामुळे या मार्गावर तासन्तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि भीषण वाहतूक कोंडी निर्माण होते. अनेकदा रुग्णवाहिकांना इथे थांबण्याची वेळ आली. स्थानिक प्रवाशांमध्ये यावरून मोठा वादही झाला होता. हीच कोंडी फोडण्यासाठी लाखो रुपये खर्चून येथे भव्य पूल उभारण्यात आला. मात्र, काम पूर्ण होऊनही पूल सुरू न केल्याने प्रशासकीय अनास्थेचा कळस गाठला गेला आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जवळ असल्याने या अरुंद पर्यायी रस्त्यावरून केवळ दुचाकीच नव्हे, तर अवजड चारचाकी वाहने आणि मालवाहू ट्रकचीही अहोरात्र वाहतूक सुरू असते. पर्यायी मार्ग अत्यंत खराब आणि अरुंद असल्याने येथे रोज लहान-मोठे अपघात होत असून, नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, जवळच मध्य रेल्वेचे मुख्य केंद्र असलेले बडनेरा रेल्वे स्टेशन आहे. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी दररोज हजारो प्रवासी याच मार्गाचा वापर करतात. रेल्वे पकडण्याच्या घाईत असणारे प्रवासी, रुग्णवाहिका आणि विद्यार्थी रोज या ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडत आहेत. लोकप्रतिनिधींना निवडणुकीपुरते राजकारण करायला वेळ आहे, पण जनतेच्या या रोजच्या त्रासाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही, अशी संतप्त भावना आता जनमानसात उमटत आहे.