रामटेक,
Car accident येथील मनसर रस्त्यावर येणाऱ्या वाहीटोला येथे रस्ता ओलांडत असलेल्या मुलींना भरधाव वेगातील लाल रंगाच्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात ९ वर्षीय काव्या संजय अनकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवार, २८ जूनला दुपारी २ वाजता घडली. आई-वडिलांसमोरच भीषण अपघात घडला. मृतक मुलीचे घर रस्त्याला लागूनच आहे.
प्रार्थना अजय कठोते (वय १२) व काव्या संजय अनकर (वय ९, दोन्ही रा. वाहीटोला) या किराणा दुकानातून सामान घेऊन घरी परतत होत्या. रस्ता ओलांडत असताना रामटेककडून मनसरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या लाल रंगाच्या कारने दोघींना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही मुली हवेत उडून रस्त्यावर पडल्या. वाहनचालक वाहन घेऊन पसार झाला. घटनेनंतर काव्याच्या आई-वडिलांनी स्वतःच्या ई-रिक्षामधून दोन्ही मुलींना रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान काव्या संजय अनकर हिचा मृत्यू झाला, तर जखमी प्रार्थना अजय कठोते हिच्यावर रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वाहीटोला परिसरात हळहळ व्यक्त होत असून रामटेक पोलिस पुढील तपास करीत आहेत.