इराणचे अस्तित्व मिटवून टाकू

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
वॉशिंग्टन
donald trump मध्यपूर्वेतील आधीच तणावपूर्ण असलेली परिस्थिती आणखी गंभीर होत असून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उग्र टप्प्यावर पोहोचला आहे. पर्शियन आखातातील होर्मुझ सामुद्रधुनी आणि आसपासच्या क्षेत्रात वाढत्या लष्करी हालचालींमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.इराणचे अस्तित्व मिटवून टाकू”,असा डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे
 

donald trump iran warning 
अमेरिकेचे राष्टअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा देत, होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाल्यास थेट हवाई हल्ल्यांचा पर्याय स्वीकारला जाईल, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढला असून आखाती प्रदेशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अमेरिकेने अलीकडेच इराणच्या लष्करी आणि धोरणात्मक ठिकाणांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर हा तणाव तीव्र झाला आहे. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणकडूनही अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि महत्त्वाच्या हितसंबंधांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बहरीन आणि कुवेतसारख्या देशांतील अमेरिकन तळांभोवती सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
दरम्यान, जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. काही व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर समुद्री वाहतूक सुरक्षिततेचा मुद्दा अधिकच गंभीर बनला आहे.इराणने मात्र अमेरिकेच्या धमक्यांना प्रत्युत्तर देत, आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. तर अमेरिका या प्रदेशातील आपल्या मित्रदेशांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.या घडामोडींमुळे संपूर्ण आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती वाढली असून आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांना वेग देण्याची मागणी जोर धरत आहे.