टोक्यो,
earthquake-in-japan : प्रशांत महासागरातील 'रिंग ऑफ फायर' क्षेत्रात भूगर्भातील हालचाली तीव्र झाल्याने जगभरात भूकंपाचे सत्र सुरूच आहे. आज, रविवारी (२८ जून) जपानला ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपाने जपानमधील अनेक इमारती आणि परिसर हादरून गेला. चिंताजनक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या ७ दिवसांत जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये तब्बल ११ मोठे आणि शक्तिशाली भूकंप आले असून यामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जपानमध्ये हाय अलर्ट, त्सुनामीचा धोका टळला?
जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली खोलवर होता. सुदैवाने, या तीव्र धक्क्यानंतर प्रशासनाने कोणतीही त्सुनामीची चेतावणी जारी केलेली नाही. मात्र, भूकंपाची तीव्रता पाहता किनारपट्टीच्या आणि संवेदनशील भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, यात कोणत्याही मोठ्या जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त नाही, परंतु काही भागांत वाहतूक आणि रेल्वे सेवा तात्पुरती विस्कळीत झाली आहे.
७ दिवसांत ११ मोठे भूकंप; शास्त्रज्ञ चिंतेत
गेल्या एका आठवड्याभराचा विचार केला तर पृथ्वीच्या विविध भागांमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसले आहेत. जपानपूर्वी तैवान, इंडोनेशिया, चिली आणि अमेरिकेच्या काही भागांसह तब्बल ११ ठिकाणी रिश्टर स्केलवर ५.५ पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप नोंदवले गेले आहेत. एकाच आठवड्यात जगभरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या भूगर्भीय हालचालींमुळे भूगर्भशास्त्रज्ञांनीही चिंता व्यक्त केली असून, टेकनॉनिक प्लेट्सच्या वाढत्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.