माऊली पार्क हद्दीत पाच गांजा तस्करांना अटक

१.७५ किलो गांजा जप्त; ६ जणांवर गुन्हा दाखल

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
वर्धा,
hinganghat police raid हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या हद्दीतील माऊली पार्क संत तुकडोजी वार्ड येथे गांजा तस्करीसह विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अ‍ॅण्टी नार्कोटिस पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे धाड टाकली असता संशयित पाच जणांच्या झडतीत गांजा आढळून आला. पथकाने तात्काळ त्यांना अटक करून १ किलो ७५ ग्रॅम गांजा आणि मुद्देमाल जप्त केला. हा गांजा नागपुरातील म्हाळगीनगर हुडकेश्वर येथील विशाल राऊत याच्याकडून आणल्याचे सांगितले. याप्रकणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
 

hinganghat police raid 
अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात असतानाच २७ रोजी वर्धा गुन्हे शाखेच्या अ‍ॅण्टी नार्कोटिस पथकाला हिंगणघाट येथील माऊली पार्क संत तुकडोजी वार्ड येथे गांजा तस्करी व विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने धाड टाकली असता सुजल कडू (१९), प्रज्वल कडू (२३) दोन्ही रा. तेलंगखडी हिंगणघाट, साहिल मून (२३) रा. सयजा शाळेजवळ सरूळ, ता. देवळी ह. मु. म्हाळगीनगर हुडकेश्वर रोड नागपूर, मृणाल गोडे (२३) रा. आई माई मंदिर जवळ रोहनखेडा, ता. हिंगणघाट ह. मु. म्हाळगीनगर हुडकेश्वर रोड नागपूर, जिवा जुनगडे (२२) रा. पाण्याच्या टाकीजवळ शिरूळ, तह. हिंगणघाट, ह. मु. म्हाळगीनगर हुडकेश्वर रोड नागपूर, हे संशयितरित्या आढळून आले. झडती घेतली असता त्यांच्याजवळ गांजा आढळला. सदर गांजा हा सुजल कडू व प्रज्वल कडू यांच्या मालकीचा आहे. तो साहिल मून, मृणाल गोडे, जिवा जुनगडे यांनी पुरवठा केला असून त्यांनी गांजा विशाल राऊत याच्याजवळून आणल्याचे सांगितले. हे सहाही जण संगनमताने गांजाची तस्करी करून विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने १ किलो ७५ ग्रॅम गांजा, एम. एच. ४३ एन. ६५२८ क्रमांकाची कार व पाच मोबाईलसह ३ लाख ९ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांवर हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सिनूकुमार बानोत, अरविंद येनूरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, सागर भोसले, अक्षय राऊत, अभिषेक नाईक आदींनी केली.