न्या. भूषण गवई यांचे प्रतिपादन
विदर्भाच्या दहा पद्मश्रींचा नागपूर विद्यापीठाद्वारे नागरी सत्कार
नागपूर,
Justice Bhushan Gavai विदर्भाच्या मातीत जन्म घेऊन विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य करणाऱ्या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा एकत्रित नागरी सत्कार हा अत्यंत प्रेरणादायी क्षण आहे. प्रत्येकाची कार्यक्षेत्रे वेगवेगळी असली तरी सेवाभाव, समर्पण आणि समाजहित सर्वांच्या कार्याची समान ओळख असून, हाच भारतीय राज्यघटनेचा मूलभूत विचार असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने रविवारी सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात विदर्भातील पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे तसेच सत्कार समितीचे अध्यक्ष ॲड. मनमोहन बाजपेयी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाषणाच्या प्रारंभी गवई यांनी सर्व सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करत नागपूर विद्यापीठाने पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा नागरी सत्कार करून आदर्श परंपरेची सुरुवात केल्याचे सांगितले. भारतीय राज्यघटनेचा गाभा बंधुभाव आणि मानवता असल्याचे नमूद करत त्यांनी विद्यापीठ गीतातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ या ओळींचा उल्लेख केला. राज्यघटनेतील मूल्ये आणि ग्रामगीतेतील विचार एकाच मानवतावादी भूमिकेचा संदेश देतात, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा आदर्श स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देताना गवई म्हणाले, ‘संपत्तीमुळे व्यक्ती प्रतिष्ठित होऊ शकते; मात्र देश आणि समाजासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारी व्यक्तीच महान ठरते.’ सत्कारमूर्तींचे कार्य या विचारांचे जिवंत उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केले.
दहा पद्मश्रींचा सन्मान
यावेळी विदर्भातील दहा पद्मश्री सन्मानित व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला. यामध्ये दिव्यांग व बेवारस मुलांसाठी आयुष्य वाहणारे शंकर बाबा पापळकर, मेळघाटातील आदिवासींसाठी चार दशकांहून अधिक काळ आरोग्यसेवा देणारे डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे, न्यूरोलॉजी आणि वैद्यकीय संशोधन क्षेत्रात योगदान देणारे डॉ. चंद्रशेखर मेश्राम, साहित्यिक व पत्रकार नामदेव कांबळे, वायनाडमधील आदिवासींसाठी कार्य करणारे डॉ. धनंजय सगदेव, झाडीपट्टी रंगभूमीचे ज्येष्ठ अभिनेते डॉ. परशुराम खुणे, ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ, श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे, उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि ग्रामविकासासाठी कार्यरत जनार्दनपंत बोते यांचा समावेश होता. उपरणे, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रामगीता असे सत्काराचे स्वरूप होते. शंकर बाबा पापळकर यांच्या वतीने त्यांची मानसकन्या गांधारी यांनी, तर सत्यनारायण नुवाल यांच्या वतीने त्यांचे नातू हर्ष नुवाल यांनी सन्मान स्वीकारला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद्मश्री नामदेवराव कांबळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शिव भावे जीव सेवा
मनोगतात न्या. गवई यांनी प्रत्येक सत्कारमूर्तीच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. या सर्वांच्या कार्याचा जवळून परिचय लाभल्याचे सांगताना त्यांनी विशेषतः ‘शिवभावे जीवसेवा’ या भावनेने आयुष्यभर रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. विलास डांगरे यांच्या कार्याचा उल्लेख केला. होमिओपॅथीच्या माध्यमातून असाध्य आजारही साध्य करण्याची किमया त्यांनी संशोधनातून साध्य केल्याचेही ते म्हणाले.