कराची
karachi terror attack पाकिस्तानमधील कराची शहरात शनिवारी, 27 जून रोजी रात्री मोठा आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला. गुलिस्तान-ए-जौहर परिसरातील युनिव्हर्सिटी रोडवर असलेल्या ‘सिंध रेंजर्स’ या निमलष्करी दलाच्या मुख्यालयाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा वापर करून हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी हे वाहन मुख्य प्रवेशद्वारावर जोरात धडकावले आणि त्यानंतर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या गोंधळाच्या परिस्थितीत पाकिस्तानी लष्कराला नेमके काय घडत आहे, हे तत्काळ समजले नाही. हल्ल्यादरम्यान ग्रेनेडही फेकण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. या भीषण घटनेत चार पाकिस्तानी रेंजर्सचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी रात्री साधारण 8:30 वाजता हा भीषण हल्ला घडला. जोरदार स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. स्फोटानंतर दहशतवादी मुख्यालयाच्या आवारात घुसले आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू ठेवला. घटनेची माहिती वेगाने पसरताच कराची पोलीस, विशेष सुरक्षा पथक (SSU) आणि दहशतवादविरोधी दल (ATF) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूंमध्ये सुमारे 90 मिनिटे जोरदार चकमक झाली. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना ठार केले, तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले आहे.या घटनेनंतर गुलिस्तान-ए-जौहर परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी प्रतिबंधित ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) शी संलग्न असलेल्या ‘जमात-उल-अहरार’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेने दावा केला आहे की हल्ल्यासाठी 9 karachi terror attack जणांना तयार करण्यात आले होते. सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलीस महासंचालकांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.
ही संघटना अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा भागात सक्रिय असल्याचे सांगितले जाते. हल्ल्यानंतर कराचीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हा हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.